सनफ्लॉवर हॉस्पीटलवर १ लाखाचा दंड
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.९) धरमपेठ झोन अंतर्गत व्ही.आय.पी.रोड रामदासपेठ येथील सनफ्लॉवर हॉस्पीटल मधील बायो मेडिकल वेस्ट सामान्य कच-यामध्ये टाकल्यामुळे रूग्णालयावर रूपये १ लाखाचा दंड लावला.
बुधवारी (ता.९) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ, व्हीसीए स्टेडीयम सिव्हील लाईन्स सदर येथील हँण्डलुम एक्सपो वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
याशिवाय पथकाद्वारे धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील अमेसर ॲण्ड कंपनी या दुकानावर कारवाई करून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत गोळीबार चौक इतवारी येथील नानक प्लास्टिक आणि राजेश प्लास्टिक या दुकानांवर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल केला. मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
उपद्रव शोध पथकाने बुधवारी ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लक्ष २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.