– खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा चौथा दिवस
नागपूर, 22 मार्च
‘पुष्पा’ चित्रपटातील श्रीवल्लीच्या ‘तेरी झलक शर्फी’ गीताने जगात धुमाकूळ घातला. अख्ख्या तरुणाईने डोक्यावर घेतलेल्या या गाण्याचे सूर आळवताच तरुणाईने मोबाईलचे लाईट सुरू करता त्याच्या सुरात सूर मिसळला आणि एकच गलका केला.
प्रसंग होता केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये ‘व्हर्सटाईल’ जावेद अली यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टचा. जावेद अली ने तु मेरी अधुरी प्यास प्यास… या गीताच्या सुरावटीसह मंचावर आगमन करताच त्याचे फोटो काढण्यासाठी कॅमेरे सरसावले. सर्वांनी एकच कल्ला केला. नागपूरसोबत आपले जुने नाते असून ‘टायगर सिटी’ नावाने ओळखल्या जाणा-या शहराचा मी दिवाना आहे, असे जावेद अली म्हणाला. नागपूरच्या ताजुद्दीन बाबांच्या पायाशी आपली सेवा अर्पण करत जावेद अलीने ‘रॉकस्टार’मधील गाणे कुं फाया कुं आणि ‘मौला मौला’ हे सुफी गीत सादर केले तर नागपूर हा संगीताचा गड असून येथील लोक संगीत समजणारे आहे म्हणत त्याने लब पर गीत सुहाने हे उपशास्त्रीय थाटातले गीत खास नितीन गडकरी यांना समर्पित केले.
‘क्यु की तु धडकन मै दिल…’ या गाण्याच्या सूरात आपले सूर मिसळत तरुणाईने जावेद अलीला खुष केले. ‘नागपूर की सुरीली ऑडियन्स को सलाम’ असे म्हणत त्याने श्रोत्यांचे कौतूक केले. त्याने कहने को जश्न बहारा है, तु जो मिला तो हो गया मै पागल…, ‘क्यु की तु धडकन मै दिल अशा अनेक सुमधूर गीतांसह दिल इबादत कर रहा है, चांद छुपा बादल में, ऑंखो की गुस्ताखियां, चुपके से रात की चादर इत्यादी गीतांची एक शृंखलाच सादर केली.
नितीन गडकरी, माजी खासदार अजय संचेती, हितवादचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेद्र पुरोहित, गिरीश गांधी, देशोन्नतीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश पोहरे, संजीव चौधरी, मिकी अरोरा, नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांची मंगळवारी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुळकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी केले आहे.
……………
तेरा साया साथ होगा…
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत आपण ऐकत नाही तर जगतो, असे म्हणत जावेद अलीने लता दिदींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘कभी मुझको याद करके जो बहेंगे तेरे आंसू… तेरा साया साथ होगा’ हे गीत सादर केले.
…………
मराठी मनांचा घेतला ठाव
शास्त्रीय, उपशास्त्रीय, रोमॅण्टीक, सुफी गीतांच्या गर्दीत जावेद अलीने अचानक ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ या मराठी गीताचे स्वर आठवून मराठी मनाच्या हृदयाचा ठाव घेतला. ‘पधारो मारे देस’ या गाण्यावर नितीन गडकरी यांना गायला लावून श्रोत्यांच्या टाळ्या घेतल्या.
…………
नागपूरकरांनी स्थापित केला आदर्श – नितीन गडकरी
नागपूरकरांनी शिस्तीचे पालन करत एक आदर्श प्रस्थापित केला असून सर्व कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला त्याबद्दल नितीन गडकरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. काही अपरिहार्य कारणास्तव नागपूरच्या कलाकारांना या महोत्सवात समाविष्ट करून घेता आले नाही. परंतु, पुढच्या वर्षी स्थानिक कलाकारांचेही निश्चितपणे कौतूक केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मनोरंजन, प्रबोधन आणि सांस्कृतिक कार्याच्या दृष्टीने समृद्ध असा हा महोत्सव निश्चितपणे सर्वांच्या सहकार्याने आपले सांस्कृतिक वैभव वाढवेल, असे ते म्हणाले.
……………..
आज महोत्सवात
हास्य कवी संमेलन – सहभाग : पद्मश्री कवी सुरेंद्र शर्मा, पद्मश्री सुरेंद्र दुबे, अरूण जेमिनी, डॉ. प्रवीण शुक्ला, कविता तिवारी व डॉ विष्णू सक्सेना
………