नागपूर, 22 मार्च
भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीला विश्वात ओळख निर्माण करून देणा-या स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म स्थापित करण्याचे स्वप्न दाखवले होते. ते नवभारताचे प्रवक्ता होते. त्यांचे विचारच देशाला विश्वगुरू बनवतील, असे मत भाजपाच्या प्रवक्ता व समाजसेविका श्वेता शालिनी यांनी व्यक्त केले.
मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत ‘स्वामी विवेकानंद’ नाटकाचा 150 व्या प्रयोग झाल्यानिमित्ताने राधिका क्रिएशन्सच्यावतीने श्वेता शालिनी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
देवता लाईफ फाउंडेशनच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते रवींद्रजी भुसारी होते तर देवता लाईफ फाउंडेशनचे प्रमुख किशोर बावणे, नाटकाच्या लेखिका शुभांगी भडभडे, निर्माते निखिल मुंडले, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, परिणिता फुके, राधिका क्रिएशन्सच्या संचालिका व नाटकाच्या दिग्दर्शिका सारिका पेंडसे यांची उपस्थिती होती.
लहानपणापासून स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी प्रभावित असलेल्या श्वेता शालिनी यांनी देशातील प्रत्येक बाल, युवावर्गापर्यंत स्वामीजींचे चरित्र पेाहोचवण्याची गरज प्रतिपादिली. प्रत्येक बालकामध्ये स्वामीजींचा प्रभाव असून त्यांना केवळ जागे करावे लागेल, असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी महिला उद्योजिका अरुणा पुरोहित, धरमपेठ महिला क्रेडीट को.ऑप. सोसायटीच्या अध्यक्ष निलिमा बावणे, इनोव्हेशन सोल्युशन्सच्या संचालिका निरजा पठानिया या कोरोना वॉरियर्सचा तसेच, ‘स्वामी विवेकानंद’ नाटकातील स्वामी विवेकानदांची भूमिका करणारे कलावंत साहिल पटवर्धन व अनिल पालकर यांचा श्वेता शालिनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रवींद्र भुसारी व किशोर बावणे यांनी नाटकाच्या 500 व्या प्रयोगासाठी शुभेच्छा दिल्या तर शुभांगी भडभडे यांनी नाटकासंदर्भातील आठवणींना उजाळा दिला. निखिल मुंडले, साहिल पटवर्धन, अनिल पालकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 8 मे ला या नाटकाचा पर्सिस्टंट ऑडिटोरियमध्ये पुढचा प्रयोग करण्यात येणार असल्याची यावेळी घोषणा करण्यात आली. सारिका पेंडसे यांनी प्रास्ताविकातून श्वेता शालिनी यांनी स्वामी विवेकानंद नाटकाच्या 150 व्या प्रयोगासाठी केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले. कार्यक्रमाला नाटकातील कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गि-हे यांनी केले. शैलजा पिंगळे यांनी आभार मानले.