चितार ओळी स्थानकाजवळ साकार होत आहे हे दृश्य
नागपूर समाचार (वासुदेव पोटभरे) : शहरात साजरा होणाऱ्या पोळा सणाचा देखावा मेट्रो पिलर वर स्थापित केल्यानंतर आता नागपुरात आणखी एक अनोखा उत्सवाचे दृश्य मेट्रो प्रकल्पांतर्गत साकारले जात आहे. दर वर्षी पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा मारबत उत्सव चितार ओळी मेट्रो स्टेशन जवळ देखावाच्या रूपाने सजीव होतं आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन या रिच-४ अंतर्गत असलेल्या मेट्रो मार्गिकेदरम्यान हा देखावा साकारला जात आहे.
मारबत उत्सवाचा हा देखावा चितार ओळी चौकात मेट्रोच्या २ पिलर वर सहा विविध दृश्यांच्या माध्यमाने साकारला जातो आहे. सुमारे १४० वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव अश्या प्रकारे दृश्य रूपाने साकारण्याची कल्पना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांची होती. या अंतर्गत दोन पिलरवर म्युरलच्या रूपाने सहा विविध दृश्ये साकारली जाणार आहे. प्रत्येक म्युरल ची उंची २४ फूट तर रुंदी ८ किंवा ९ फूट आहे. काळी आणि पिवळी मारबतचे दृश्ये या माध्यमाने साकारले जाणार आहे.
हे म्युरल लोखंडाच्या पाईपच्या आणि धातूच्या माध्यमाने तयार केले आहे. निर्मिती प्रक्रियेत एम्बॉसिंग, वेल्डिंग आणि म्युरला विशेष रंग दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागला आणि शहरातील ललित कला क्षेत्रातील डॉ विनोद इंदूरकर यांच्या देखरेखी खाली म्युरल ची स्थापना होते आहे. मारबत हा अनोखा उत्सव दर वर्षी फक्त नागपुरातच साजरा होतो. पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा होतो. महत्वाचे म्हणजे महा मेट्रो तर्फे पोळा सणा संबंधीचा देखावा या आधी कॉटन मार्केट चौकात साकारला आहे. दर वर्षी साजरा होणाऱ्या या मारबत उत्सवात मोठी मिरवणूक निघते आणि यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. ज्या मार्गाने हि मरवणूक जाते तिथे दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक यात साकारलेली दृश्ये बघायला गर्दी करतात.
महा मेट्रोने या आधी सुभाष नगर मेट्रो स्टेशन जवळ फ्लेमिंगो पक्षाच्या थवा साकारला आहे. या शिवाय छत्रपती स्टेशन जवळ कामगार काम करताना देखील दाखवले आहेत. या शिवाय महा मेट्रोच्या एयर पोर्ट स्टेशनवर सेवाग्राम वर्धा येथील बापू कुटीची प्रतिकृती स्थापित केली आहे. तर झाशी राणी मेट्रो स्टेशनच्या दर्शनी भागात राणीचे म्युरल साकारले आहे. रिच-४ मार्गिकेवरील दोसर वैश्य स्टेशनच्या दर्शनी भागात हातात तिरंगा घेतलेले नागरिक दाखवले आहेत. एकूण, इतिहासासंबंधी देखावा साकारताना मेट्रोने नागपुरात जपल्या जाणाऱ्या परंपरांचा देखील अश्या पद्धतीने सन्मान केला आहे.