गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे :
नागपूर समाचार : गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे.भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.
शिक्षक या शब्दाचा अर्थ शि म्हणजे शीलवान क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष असा होतो. समाज व देश बांधणीत शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असे प्रतिपादन पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी केले आहे.ते श्री शंकरप्रसादजी अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग द्वारा आयोजित शिक्षक दिनाच्या पर्वावर बोलत होते. यावेळी डॉ.दिनेश मुरकुटे व प्रा.निळकंठ ढोबाळे यांचा सत्कार करण्यात आला.
पंडितजींनी गुरुशिष्य परंपरेची महती विशद करताना श्री शंकराचार्य यांचे उदाहरण दिले,ते म्हणाले की जेव्हा शंकराचार्य यांनी संन्यास घ्यायचे ठरविले तेव्हा त्यांनी त्यांच्या आईकडे याची परवानगी मागितली असता,आई त्यांना म्हणाली की माझ्या शेवटच्या व थकत्या काळात परत येशील असे म्हणून त्यांना परवानगी दिली. त्यांनी देशभर भ्रमण केले,ओंकारेश्वर येथे त्यांची बाबा गोविंदानंद यांच्याशी भेट झाली त्यांनी त्यांना गुरू मानले.
त्यांची महती खूप पसरली असता त्यांना मंडण मिश्र या त्याकाळच्या अत्यंत मोठया विद्वानाने त्यांना शास्त्रार्थ करीता बोलावले असता ते तिथे गेले त्यावेळी मंडण मिश्र त्यांना म्हणाले की शास्त्रार्थात जर मला हरविले तर मी आपला शिष्य होईल आणि जर तुम्ही हरले तर तुम्हाला माझा शिष्य व्हावे लागेल यामध्ये मंडण मिश्र हरले. त्यावेळी त्यांच्या पत्नी शंकराचार्यांना म्हणाल्या की मी त्यांची अर्धांगिनी आहे मी तुमच्या सोबत शास्त्रार्थ करायला तयार आहे.
त्यावेळी त्यांनी शंकराचार्यांना कोकशास्त्र बद्दल माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की मी संन्याशी आहे याचे उत्तर मी आपणास चार महिन्यांनी देईल. त्यानंतर त्यांनी एक युवा राजाच्या मृत शरीरात प्रवेश केला व त्या राज्याच्या पत्नीसोबत चार महीने राहिले त्यानंतर त्यांनी मंडण मिश्र यांच्या पत्नीसोबत शास्त्रार्थ करून कोकशास्त्राचे संपुर्ण ज्ञान त्यांना सांगितले व शास्त्रार्थात पराजित केले. शंकराचार्यांनी चारीधाम येथे चार मठांची स्थापना करून संपूर्ण भारताला एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यांनी वेदांतावर भाष्य केले तसेच अनेक पुस्तके लिहिली. सनातन धर्म हिंदू संस्कृती चे महती विशद केली.