नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग ज्येष्ठांना साहित्य वाटप करणार
नागपूर समाचार : सर्व आमदारांनी या लोकसेवेच्या कार्यात वैयक्तिक लक्ष घालावे आणि प्रशासनाच्या सहकार्याने साहित्य वाटप यशस्वीपणे होईल याची खातरजमा करावी, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना आणि अडिप योजनेंतर्गत नागपूर शहरातील सुमारे 28 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. पुढच्या टप्प्यात जिल्ह्यातील 7 हजार लाभार्थ्यांना तालुकानिहाय उपकरणे वाटप करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, राजू पारवे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत केलेल्या विविध कामांची माहिती दिली. नागपूर फ्लाईंग क्लबच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निवारणासाठी वेकोलिने जनता दरबार घ्यावेत : वेस्टर्न कोल फिल्ड लिमीटेडच्या अनेक खाणींच्या क्षेत्रात नागरिकांचे अनेक प्रश्न व समस्या प्रलंबित असून त्यांचे निराकरण तातडीने करण्यासाठी वेकोलीने जनता दरबार आयोजित करावेत, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिले.
वेकोलिशी संबंधित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, भूसंपादन, पुनर्वसन, भरपाई, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आदी मुद्यावर श्री. गडकरी यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. लोकप्रतिनिधी म्हणून वेकालिशी संबंधित प्रकल्पग्रस्त व अन्य लोक आपले प्रश्न व निवेदन घेवून आमच्याकडे येतात. ती निवेदने वेकोलि प्रशासनाकडे पाठविली जातात. मात्र, त्यातून लोकांच्या समस्यांचे निराकरण आवश्यक त्या वेगाने होताना दिसत नाही. त्यामुळे वेकोलिने जनता दरबार आयोजित करावे आणि प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करावे. या सर्व समस्यांचा एका महिन्यात निपटारा व्हावा, असे निर्देश श्री. गडकरी यांनी दिले. वेकोलीचे सीएमडी श्री. मनोजकुमार, श्री. संजयकुमार तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.