23 नोव्हेंबरला आदिवासी गोवारी शहिद स्मृती दिन
नागपूर समाचार : आदिवासी गोवारी शहिद दिनानिमित्त श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन 23 नोव्हेंबर रोजी झिरो माईल येथे करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी येणाऱ्या गोवारी बांधवांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार व सुरक्षा व्यवस्थेबाबत संबंधित सर्व विभागाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.
आदिवासी शहिद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम नियोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, आदिवासी गोवारी शहिद स्मारक समितीचे अध्यक्ष शालीक नेवारे, सचिव शेखर लसून्ते, कैलास राऊत तसेच समितीचे सदस्य, महापालिका, महावितरण, वाहतूक विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
22 व 23 डिसेंबर रोजी शहिद स्मारकाजवळील वाहतूक व्यवस्था वळती करण्याचे निर्देश त्यांनी वाहतूक विभागांना दिले. महापालिकेने स्वच्छता व पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. त्यासोबतच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.
22 नोव्हेंबर रोजी 5 वाजता संस्कृती पूजन व 6 वाजता ढाल पूजन होणार आहे. स्मारक पूजन कॅण्डल मार्च 7 वाजता होणार असून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता दीप प्रज्वलन करुन स्मारसमितीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यासोबतच विविध संघटनाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.
आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.