उपमुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी
नागपूर समाचार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ११ डिसेंबरचा हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा दौरा लक्षात घेता उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे. सकाळी नऊ पंचेचाळीसला त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स (महामार्गाचे सुरुवातीचे ठिकाण) येथून ते प्रवासाला सुरुवात करतील. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा प्रवास उद्या ते करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.
उपमुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी : दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला लक्षात घेऊन आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा तालुक्यातील वायफळ या गावाजवळील कार्यक्रम स्थळाला भेट दिली. कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,व अन्य अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांनी काही सूचना केल्या. समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किमीचा लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतीमान होईल. एकूण १२० मीटर रुंदीचा हा सहा पदरी महामार्ग असणार आहे.