संस्कार आणि संगत व्यक्तिमत्व घडवतात – डॉ दीपक कुलकर्णी
नागपूर समाचार : चांगल्या संस्कारांना जर चांगल्या संगतीची जोड मिळाली तर देशाच्या विकासासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व घडते] असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व सॉफ्ट स्किल्स ट्रेनर दीपक कुळकर्णी यांनी केले.
एम.एस.आर.टी.सी. एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर तर्फे ‘हम होंगे कामयाब – व्यक्तिमत्व विकास व करिअरची निवड’ या विषयावर आज शिक्षक सहकारी बँक सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर व अमरावती प्रदेशाचे उपव्यवस्थापक श्रीकांत गभणे, एम.एस.आर.टी.सी.एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष शैलेश भरती यांची प्रमुख उपस्थिती होती
दीपक कुळकर्णी म्हणाले, संस्कार हे व्यक्ती घडवतात आणि आयुष्यभर त्याच्या वर्तणुकीचा भाग बनतात. याच विषयी उदाहरण देताना त्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अनिल गुरव या तीन उत्तम क्रिकेट खेळाडूंचे उदाहरण दिले. गुरूंचे संस्कार, मार्गदर्शन , सातत्य , जिद्द, नम्रता आणि व्यसनांपासून लांब राहिल्याने सचिन तेंडुलकर भारतरत्न हा सर्वोच्च सम्मान मिळवू शकले असे ते म्हणाले. हेच सातत्य आणि संस्कार इतर दोघांनी जोपासले नाही. आज सचिन तेंडुलकर यांनी स्वतःसोबत देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आणि हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे देशासाठीचे योगदान ठरले, असे ते म्हणाले.
सुरवातीला श्रीकांत गभणे यांनी आपले व्यक्तिमत्व आपण घडवायचे आणि प्रगती करायची असा सल्ला देतानाच आजच्या जगात सॉफ्टस्किल्स आणि संवाद कौशल्य आत्मसात करणे महत्वाचे आहे असे सांगितले. तर शैलेश भारती यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कर्मचारी आणि कुटुंबीयांचा सर्वसमावेशक विकास व्हावा या उद्देशाने कार्यशाळा आयोजित केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश लाखे यांनी केले तर कार्यक्रमाला संचालक श्रीमती एस एस सोनटक्के ,श्रीमती एस ए केवाले, सर्वश्री एस आर महल्ले, भांबल जी, जुमडेजी, चौधरीजी आणि भागवत जी यांची विशेष उपस्थिति होती. या कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.