दहीहंडी व गोपालकाल्याने श्री गुरु मंदिर जयप्रकाश नगर येथे दत्त जयंती नवरात्रोत्सवाची सांगता
नागपूर समाचार : श्री गुरु मंदिर जयप्रकाश नगर येथे दत्त जयंती नवरात्रोत्सवाचे आज काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने समारोप झाला. श्री गुरुमंदिर जयप्रकाश नगर येथे श्री दत्तजयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. भाविकांनी उत्साहात या सर्व कार्यक्रमाना गर्दी केली व धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला.
उत्सवाच्या अखेरच्या दिवशी काल्याचे कीर्तन करताना डॉ. रमेश गोडबोले यांनी सहज श्रीकृष्णाच्या लीला सांगितल्या. त्यानंतर उपस्थित लहान बालकांना गोपाळकाला भरवून दहीहंडी उत्सव केला. बहुसंख्येने बालक राधा कृष्ण वेशात होते. भाविकांनी बराच वेळ फेर धरून आनंदोत्सव साजरा केला व गोपाळकाला ग्रहण केला. प.पू. सद्गुरू दास महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
डॉ. रमेश गोडबोले व सहकाऱ्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर जवळजवळ २००० लोकांनी महाप्रसाद ग्रहण केला व उत्सवाची सांगता झाली.