विदर्भाच्या विकासाचे स्वप्न मोदी करतात आहेत पूर्ण
नागपूर समाचार : मागच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री पदावर असणारे देवेंद्र फडणवीस हे अठरा अठरा तास काम करीत होते, समृद्धी महामार्गात कोण अडथळे आणत होते हे देखील त्या काळी नगरविकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे यांना माहिती आहे, त्यामुळेच समृद्धी महामार्गाचे जे काम झालेले आपण पाहतोय, ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणूनच होऊ शकले, असे विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले. प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाना साधत, ज्यांना त्यांच्या गावात एका नालीचेही बांधकाम करता आले नाही, जे सोन्याच्या चमच्याने बादामाचे ज्यूस पितात ते समृद्धी ऐवजी ग्रामीण भागातील विकासाबाबत का नाही बोलत? ग्रामीण भागातील विकासाची संकल्पना देखील त्यांना माहिती नाही,समृद्धी बाबत बोलणा-यांविषयी योग्य वेळी बोलणार, असा सूचक इशारा बावणकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला. यावर एकनाथ शिंदे देखील बोलतील असे ते म्हणाले.
महत्वाचे म्हणजे फडणवीस यांनी स्वत: समृद्धी महामार्गासाठी तीन-तीन,चार-चार तास बसून,एकनाथ शिंदे तेव्हा नगरविकास मंत्री होते,अनेक अद्यावत फॅसिलिटी समृद्धि महामार्गाच्या आराखड्यात जोडत गेले,डिझाईन करताना मुख्यमंत्री म्हणून अतिशय लक्षपूर्वक व पूर्ण अभ्यासपूर्वक काम केले,नागपूर ते मुंबई कशी जोडल्या जाईल आणि यातून सर्वच क्षेत्राचा विकास कसा करता येईल यासाठी ज्या पद्धतीनं मेहनत केली,एखाद्या मुख्यमंत्री पदावर बसल्यावर आपलं आयुष्य टाकून, प्रकल्प पूर्ण करु शकतो,ते फक्त फडणवीसच करु शकतात,अशी पुश्ती त्यांनी जोडली.
नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकापर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या सकाळी होत असले तरी शिर्डी ते नागपूर मार्गावरील परतवाडा येथे किमान १२ किलोमीटरचा रस्ता अद्याप अपूर्ण आहे,याकडे लक्ष वेधले असता शिंदे अाणि फडणवीस हे २०-२० मॅच खेळणारे गडी आहेत, अठरा अठरा तास ते सातत्याने कामच करत असतात,त्यामुळे महाराष्ट्राचा असो किवा समृद्धीचा विकास त्यांच्या हातून सूटूच शकणार नाही त्यामुळे अपूर्ण महामार्गाची कळजी करु नये, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री २०-२० मॅच खेळतात त्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार होत नाही का? या प्रश्नाला मात्र बावणकुळे यांनी हसून बगल दिली. गेल्या अडीच वर्षात तर राज्यात कोणताच कारभारच झाला नाही कारण त्यांच्या हातात पेनच नव्हता, त्यामुळे कोणत्याही धोरण प्रक्रियेवर सह्याच होत नव्हत्या, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हाणला.
काल काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मेट्रो-फेज २ च्या जाहीरात फलकांवर फक्त ‘थँक्यू मोदी’एवढंच प्रसिद्ध केलं असून उपराजधानीत ज्या गडकरींनी केंद्रिय मंत्री म्हणून प्रत्यक्षात मेट्रो साकारली त्यांच्याही छायाचित्राला जाहीरात फलकांवर स्थान नसल्याची जहाल टिका केली होती, याकडे लक्ष वेधले असता, कदाचित तो केंद्र सरकारचा प्रोटोकॉल असावा, नितीन गडकरींना कोण डावलणार? ते नागपूरातील घरा-घरात, मना-मनात वसले आहेत, गडकरी हे मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यांची उंची खूप मोठी आहे त्यामुळे मेट्रोच्या श्रेयनामावलीतून गडकरींना डावलण्याची कोणालाही गरजच नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.
हिंदूह्दय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लाेकापर्ण, वंदे मातरम नागपूर क्रांती एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवण्याचा तसेच मेट्रोच्या फेज-२ टप्प्याचं उद् घाटन यासाेबतच अनेक नव्या घोषणांसहीत उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन नागपूरात होत आहे. ६५ वर्षाच्या मागच्या सरकारच्या काळामध्ये नागपूर ही उपराजधानी झाली पण नागपूर कराराप्रमाणे कोणताही विकास उपराजधानीचा झाला नाही, करार झाला, घोषणा झाल्या पण विकास मात्र झाला नाही. नागपूर आणि विदर्भाच्या विकासाचे स्वप्न मोदी हे पूर्ण करीत असल्याचे बावणकुळे म्हणाले.
२०१४ ते २०१९ याच काळात उपराजधानीचे चित्र पालटले. आता उपराजधानी ही महाराष्ट्राची उपराजधानी वाटू लागली आहे. दहा वर्षांपूर्वी नागपूरचे चित्र वेगळे होते. नुकतेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरुन एकत्रित प्रवास केला, साढे चार तासांमध्ये नागपूर ते शिर्डी प्रवास केला. जवळपास ९ जिल्ह्यांचा प्रवास झाला. एकंदरीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई या मार्गावर ७२१ किलोमीटर समृद्धी महामार्गामुळे केवळ दळणवळणच नाही तर औद्योगिक विकास देखील घडून येणार असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील संत्रे, इतर पीक सगळे अल्पावधीत राज्याच्या राजधानीत पोहोचू शकणार आहेत, त्यामुळे विदर्भ ख-या अर्थाने समृद्ध होणार आहे, आतापर्यंत मागासलेपणाचा ठपका विदर्भावर होता, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ झाले, मराठवाडा वैधानिक विकासमंडळ असो किवा उर्वरित महाराष्ट्रासाठीचे वैधानिक विकास मंडळ असो, खरी विकासाची सुरवात आता होत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही समृद्धी महामार्गासाठी आभार मानताना, बावणकुळे यांनी शिंदे यांनी हा प्रकल्प गोंदीयापर्यंत नेणार असल्याचे जाहीर केल्याचे सांगितले. या प्रकल्पातील उर्वरित बाबींकडे शिंदेंनी तातडीने लक्ष घातले असल्याचे ते म्हणाले. गोंदीया पर्यंत हा प्रकल्प गेला तर याला अजून समृद्धी लाभेल असे ते म्हणाले. तिथे धान पिक आहे, खाणी आहेत, भंडारा, गोंदीयाचा औद्योगिक विकास देखील यामुळे होईल, शेतक-यांची आर्थिक क्षमता, जमीनीची किंमत दहा पटीने वाढेल. मुंबईत पाच कोटी ऐकरी म्हणजे दहा पटीने महाग प्रकल्प टाकण्या ऐवजी तोच प्रकल्प गोंदियामध्ये उभारला तर कमी पैश्यात होऊ शकतो. समृद्धीमुळे केवळ विदर्भाचीच नव्हे तर महाराष्ट्राचीच दळवळणाची क्षमता वाढणार असल्याचे ते म्हणाले.
गडकरी यांनी देखील राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणून खूप प्रकल्प केले व त्यामुळे विदर्भाला समृद्धी लाभली असल्याचे ते म्हणाले.विकासाचे स्वप्न घेऊन काम करणारे आम्ही, मोदींच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते आहोत.नागपूरचे खासदार असणारे गडकरींनी नागपूरकरांकडून मतांचं दान घेतल्यानंतर ज्याप्रमाणे मेट्रो,उड्डाण पुले,रस्त्यांचा विकास केला,योजना मंजूर करुन घेतले,मेट्रो-२ प्रकल्पाचंही काम पूर्ण झाल्यानंतर कामठी,कन्हान,कापसीपर्यंत दळणवळण सुरु होणार असून लाखो कर्मचा-यांना याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर तिस-या टप्प्याची देखील आम्ही मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.यामुळे खाणी क्षेत्रात काम करणा-यांना लाभ होईल,असे ते म्हणाले.मिहानमध्येच ३५ हजारांच्या वर कर्मचारी आहेत त्यांना देखील मेट्रो -२ प्रकल्पाचा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.मोदी यांनी गडकरी यांच्या विनंतीला मान देऊन या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे बावणकुळे म्हणाले.
समृद्धी महामार्गाचा कार्यक्रम केवळ नागपूरात होणार नसून आठ जिल्ह्यात होणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. वर्धा जिल्हा, बुलढाणा, वाशिम, जालना, औरंगाबाद इत्यादी आठ ठिकाणी व्हर्च्यूली हा उद् घाटनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार, खासदार व केंद्रिय मंत्री देखील उद् घाटन होणा-या जिल्हयाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींचे जागोजागी करा जोरदार स्वागत : याप्रसंगी बावणकुळे यांनी नागपूर शहराच्या जनतेला विनंती केली, मोदी हे ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या सर्व रस्त्यांवर उभे राहून मोदींचे नागपूरकरांनी जोरदार स्वागत करावे. मोदी हे रेल्वे स्टेशनवर जाणार आहेत त्या नंतर ते झिरो माईल येथे प्रदर्शनीला भेट देणार आहेत, यानंतर ते मिहान येथील एम्समध्ये सभेसाठी जाणार आहेत, या सर्व ठिकाणच्या रस्त्यांवर नागपूरकर जनतेनी उस्फूर्तपणे मोदींचे स्वागत करावे. मोदींनी ज्या प्रकारे नागपूरला उपराजधानी म्हणून जे अनुदान दिले आहे,ते बघता सर्व नागपूरकर जनतेने त्यांच्या जोरदार स्वागतासाठी सज्ज व्हावे.याशिवाय एम्समध्ये ज्या ठिकाणी मोदी हे सभेला संबोधित करणार आहेत त्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बावणकुळे यांनी केले.
विदर्भ व नागपूर शहर जिल्ह्याच्या सर्व ग्रामस्थांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले. ज्या नेतृत्वाने विकासाकरीता मदत केली,त्यांचं मनापासून स्वागत झालं पाहिजे, असे ते म्हणाले. मतांचं कर्ज विकास प्रकल्प राबवूनच जनतेला व्याजासहीत परत केले पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. म्हणूनच भाजपचं सरकार जेव्हा जेव्हा येतं तेव्हा त्या त्या भागामध्ये विकास हा दिसून पडत असतो. नुसता विकासच नव्हे तर मोदींच्या नेतृत्वात गरीब कल्याण योजनांपासून तर विश्वाच्या नकाश्यामध्ये देशाचे स्थान ठलकपणे अधोरेखित ही झाले असल्याचे सांगून अगामी जी-२० च्या अध्यक्षपदाचे त्यांनी उदाहरण दिले.
मोदींनीच जगाच्या समोर भारतीय संस्कृती मांडली, भारतीय तत्वज्ञान मांडले म्हणूनच जगातील तब्बल दीडशे देशांपेक्षा जास्त देशांनी मोदींना ‘लोकनेते’मानले असल्याचे बावणकुळे म्हणाले. यातूनच जी-२० चे अध्यक्ष पद भारताला मिळाले. मोदी यांनीच सव्वाशे कोटी जनतेचा जीव करोनापासून वाचवला.
भारतातच लस निर्मिती केली,एवढंच नव्हे तर करोनाच्या संकटात सापडलेल्या अनेक देशांना लसींचा मोफत पुरवठा देखील केला. इतकं मोठं नेतृत्व ज्यांनी आपला जीव वाचवला, तुमच्या माझ्या जीवाचे रक्षण केले, असे विश्वाचे गौरव असलेले मोदी उद्या नागपूरात येत आहेत,त्यामुळे नागपूरांकरांची भूमिका खूप महत्वाची आहे. उद्या रविवार आहे,सुटीचा वार आहे, लाखो नागपूकरांनी रस्त्यावर येऊन मोदींचं स्वागत करावं अशी विनंती त्यांनी याप्रसंगी केली.
पत्र परिषदेला आमदार मोहन मते, शहराध्यक्ष प्रवीण दटके, ग्रामीणचे अध्यक्ष, माजी महापौर संदीप जोशी, अर्चना डेहनकर, संजय भेंडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ.मिलिंद माने, प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम, शिवानी वखरे चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.