‘सहजीवन आनंदाचे भाग -२’ संगीतमय चर्चेच्या कार्यक्रमात तज्ञांचा सल्ला
नागपूर समाचार : वैवाहिक जीवनात भांडणे होणारच मात्र ती प्रत्येक वेळी विकोपाला जात असतील, दुरावा निर्माण करत असतील किंवा आपापसात सामंजस्याने मिटवता येत नसतील तर त्यासाठी समुपदेशन वेळीच घेण्याचा सल्ला मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक डॉ. स्वाती धर्माधिकारी आणि लैंगिकता तज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे यांनी दिला.
रसिकांच्या खास आग्रहास्तव माईंड पार्क फाउंडेशन आणि निरामय बहूउद्देशीय सेवा संस्था यांच्या सौजन्याने आयोजित ऋतुराज प्रस्तुत ‘सहजीवन आनंदाचे भाग-२’ हा संगीतमय, चर्चात्मक व प्रबोधनपर कार्यक्रम आज सायंटिफिक सभागृह येथे आयोजिण्यात आला त्यावेळी ते दोघे मार्गदर्शन करताना बोलत होते.
शोध मनाचा, नात्यांचा आणि निरामय सहजीवनाचा ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन आनंदी सहजीवनाचे विविध पैलू या कार्यक्रमातून उलगडण्यात आले.
यावेळी डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी ‘ भांडा सौख्यभरे’ असे सांगताना नात्यात एकमेकांना व्यक्त होण्यासाठी ‘स्पेस’ देणे, भांडत असताना शब्दांचा काळजीपूर्वक वापर, आजूबाजूच्या परिस्थितीचे भान, या सर्वांच्या गरजेवर भर दिला. भांडण होण्याच्या कारणांचेआकलन करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.
डॉ. संजय देशपांडे यांनी ‘संभोग’ म्हणजे केवळ कामतृप्ती नसून त्यात मानसिक समाधानाचा मोठा पैलू असल्याचे सांगितले. नात्यात सम-भोग, अर्थात दोघांना सारखे सुख मिळाले पाहिजे आणि त्याचा विचार दोघांनी करायला हवा असे ते म्हणाले. असे करत असताना एकमेकांच्या इच्छा, भावना यांचा सन्मान होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय कुटुंब प्रबोधन संयोजक डॉ. रवींद्र जोशी यांनी सहनशीलता आणि तडजोड हे गुण वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाला पूरक असल्याचे सांगितले. यावेळी गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य-अय्यर आणि सारंग जोशी यांनी चर्चेनुरूप ‘ जीवनात ही घडी, इस मोड से जाते है, शब्दावाचून कळले, का रे दुरावा, सुहानी रात ढल चुकी अशी सुंदर गीते सादर केली. परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र आणि मुग्धा तापस यांनी त्यांना उत्तम वाद्यसंगत केले. या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तपास यांची आहे. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन किशोर गलांडे यांनी केले.
तत्पूर्वी माईंड पार्क फाउंडेशनचे डॉ. क्षीरसागर आणि डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी कार्यक्रमाची भूमिका प्रस्ताविकातून मांडली. माईंड पार्क या उपक्रमाबद्दल क्षीरसागर दाम्पत्याचे सर्वच स्तरतून यावेळी कौतुक झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.