स्टॉलवर 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत
नागपुर समाचार : शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा स्टॉल हिवाळी अधिवेशननिमित्ताने नागपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विधानभवन परिसरात लावण्यात आला आहे. या स्टॉलचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ मासिक हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असून या मासिकाला तब्बल सात दशकांची यशस्वी परंपरा लाभली आहे. हे मासिक राज्याचा जडणघडणीचा बोलका साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणजे लोकराज्य. विश्वासार्ह माहितीमुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरलेले आहे.
स्टॉलवर 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध विशेषांकही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ‘लोकराज्य’ स्टॉल लावण्यात आला आहे.