ग्रामायण सेवा प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
नागपूर समाचार : ग्रामीण भागातून आलेल्या बचत गट, गृह उद्योगांनी ऑनलाईन माध्यमातून आपल्या वस्तूंची विक्री केल्यास त्यांना त्यांचा आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे ग्रामायण सेवा प्रदर्शनाने त्यांच्यासाठी ऑनलाईन माध्यम खुले करून द्यावे, असे मत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यक्त केले.
ग्रामायण प्रतिष्ठानाच्यावतीने व नागपूर महानगरपालिका व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या सहकार्याने आयोजन ग्रामायण सेवा प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी रामनगर मैदानातील स्व. मनोहरराव परचुरे व्यासपीठावर पार पडला.
कार्यक्रमाला श्रीमती श्वेताली जकाते, मिसेस भारत, युएसए, वारांगनांच्या मुलांसाठी आयुष्यभर झटणारे विमलाश्रमचे रामभाऊ इंगोले, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, अमरावतीचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत उर्फ छोटू भाऊ वरणगावकर, पतंजली योग समिती नागपूरचे प्रमुख प्रदीप काटेकर, अॅड आनंद परचुरे, रवी वाघमारे, अनिल सांबरे, संजय सराफ यांची मंचावर उपस्थिती होती. माजी नगरसेविका परिणिता फ़ुके व रोटरी क्लब नागपूर पश्चिमचे अध्यक्ष गजानन रानडे यांचीदेखील कार्यक्रमाला उपस्थिती होती.
पोषण, आरोग्य आणि पर्यावरण या तीन विषयांवर प्रदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्वेताली जकाते, छोटू भाऊ वरणगावकर, रामभाऊ इंगोले व प्रदीप काटेकर यांनी ग्रामायणला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री अलकरी यांनी, सूत्रसंचालन नरेंद्र गिरीधर केले. राजेंद्र काळे यांनी प्रदर्शनाबद्दल माहिती दिली तर मिलिंद गिरीपुंजे यांनी आभार मानले. श्रावणी बुजोणे यांनी ग्रामायन गीत सादर केले.
दिव्यांगांसाठी जुगाडू कार : स्वतः दिव्यांग असलेल्या डॉ. प्रकाश अंधारे यांनी एक जुगाडू कार तयार केली असून ती त्यांनी ग्रामायण प्रदर्शनामध्ये दिव्यांग व्यक्तींना मदतीकरीता ठेवण्यात आली आहे. ही जुगाडू प्रदर्शनीच्या पहिल्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरली. उद्घाटन कार्यक्रमात डॉ. प्रकाश अंधारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तर्पण फाउंडेशन देणार स्कॉलरशिप – आ. श्रीकांत भारतीय : उद्घाटन कार्यक्रमानंतर पार पडलेल्या विदर्भातील एनजीओच्या संमेलनाला संबोधित करताना तर्पण फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक आ. श्रीकांत भारतीय यांनी बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलांवर पीएच.डी. करणा-या एमएसडब्ल्यू, सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कालरशीप जाहीर केली. ते म्हणाले, तर्पण फाउंडेशन मागील अनेक वर्षांपासून अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर बालगृहातून बाहेर पडणा-या मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत.
या मुलांकडे नेहमीच समाज आणि सामाजिक संस्थांचे दुर्लक्ष झाले आहे. या मुलांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून त्यांचे पालकत्व घेण्यासाठी व सनाथ करण्यासाठी समाजाने समोर येण्याची गरज आहे. या मुलांच्या स्थितीवर संशोधन करण्याची आज खरी गरज आहे, असे मत त्यांनी मांडले. या संमेलनाला महाराष्ट्रातील 27 एनजीओच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे सर्वांचे आभार मानले.