सर्दी, खोकल्यासह काही आमदारांना तापसुद्धा आलेला आहे
नागपूर समाचार : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नागपूरसह विदर्भात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अधिवेशनात सर्व आमदार मंत्री थंडीपासून बचाव करणारे कपडे घातलेले दिसतात. अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत निम्म्या आमदारांना सर्दी आणि खोकला झालेला आहे.
सर्दी, खोकल्यासह काही आमदारांना तापसुद्धा आलेला आहे, तर काहींना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचीही समस्या सतावत आहे. विधानभवन परिसरात एकूण ६११ जणांची तपासणी आतापर्यंत झालेली आहे. कडाक्याच्या थंडीत दोन्ही सभागृहाचे वातावरण तापत आहे. तसा काही आमदारांनाही ताप आला आहे. नागपुरात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहात आहे. मुंबईच्या लोकांना या थंडीची सवय नाही. त्यामुळे नागपूर अधिवेशनात काम करताना त्यांना त्रास होतो आहे.
काल बुधवारपासून सकाळी ९ वाजता कामकाज सुरू होत आहे. त्यामुळे ८ – ८.३० वाजतापासूनच आमदार विधानभवन इमारतीच्या परिसरात येण्यास सुरुवात होते. थंडीमुळे गरम कपडे परिधान करून ही मंडळी वावरताना दिसतात. दुपारी १२ वाजताच्या नंतर थंडी कमी होते. नंतर सायंकाळी ५.३० – ६ वाजता पुन्हा थंडी जोर पकडते. विदर्भातील आमदारांचा प्रश्न नाही. पण राज्याच्या इतर भागातील, त्यातल्या त्यात मुंबईतील लोकांना मात्र नागपुरातील थंडीने चांगलेच त्रस्त केले आहे.
आमदारांसह इतर लोकांनी विधानभवन इमारत परिसरात असलेल्या आरोग्य केंद्रावर तपासण्या करून घेतल्या. येथे कोरोनाची तपासणी करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर आमदारांसह अधिकारी कर्मचारीसुद्धा तपासण्या करताना दिसतात. काल सभागृहात कोरोनाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तपासणी करून घेण्याकडे सर्व जण जातीने लक्ष देताना दिसतात. शहरातील वातावरण थंड होत असताना सभागृहातील वातावरण मात्र दररोज तापत आहे