नागपुरात १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे थाटात उद्घाटन
नागपूर समाचार : संशोधनाच्या क्षेत्राने भारताला स्वावलंबी बनविण्यासाठी कार्य करायला हवे. भारतीयांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या संशोधनावर शास्त्रज्ञांनी भर द्यायला हवा. त्याचा प्रभाव संपूर्ण मानवतेवर देखील होईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नागपुरात विद्यापीठ परिसरात सुरु झालेल्या १०८ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, जगातील १८ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात राहते. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन साऱ्या जगभरासाठीच मार्गदर्शक ठरत आहे. भारताने केलेल्या असाधारण कार्याची चर्चा आज जगभरात होत आहे. १३० देशांचा समावेश असलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताने ८१ व्या (२०१५) स्थानावरून ४० व्या स्थानावर झेप घेतली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदी हे व्हर्च्युअली सहभागी झाले होते. व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ जितेंद्र सिंह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांची उपस्थिती होती. यंदाच्या विज्ञान कॉंग्रेसची ध्येय वाक्य हे ‘शास्वत विकास आणि महिला सक्षमिकरणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ असे ठेवले गेले आहे.
आगामी २५ वर्षातील भारताच्या यशात वैज्ञानिक समुदायाचा महत्त्वपूर्ण वाटा असेल, असे मत व्यक्त करून पंतप्रधान मोदी म्हणाले, केवळ विज्ञानातूनन महिला सक्षमिकरण नाही तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमीकरण करायला हवे, असे मतही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. भारत स्टार्टअपच्या बाबतीत जगात पहिला तीन देशात आहे. तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे विज्ञान, संशोधनाला गती देण्याचे आमचे ध्येय आहे. शेवटच्या घटकापर्यंत विज्ञान पोहोचायला हवे. ज्ञानातून जगाचे भले करणे, हेच संशोधकांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय आपल्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. गाव, गरीब, कामगार यांच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, देशातील जनमानसात योग्यता, क्षमता आणि कष्ट करण्याची ताकद आहे. फक्त कमतरता होती ती वातावरणाची. मोदींच्या नेतृत्वात ते निर्माण करण्यात आले आहे. आपली आजची सर्व आव्हाने ही वैश्विक आहेत, असेही ते म्हणाले.