जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित शिबिराचे उदघाटन
नागपुर समाचार : नैसर्गिक आपत्तीची माहिती देण्यासाठी व सामना करण्यासाठी आपदा मित्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आज बीएसएनएलचे महाव्यवस्थापक यश पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 12 दिवसीय हे निवासी प्रशिक्षण शिबिर असणार आहे.
उदघाटन कार्यक्रमाला नागपुरचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उदघाटक यश पालेकर म्हणाले की, कुठलीही आपत्ती ही सांगून येत नाही. ती अचानक येते. त्यामुळे या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण तयार राहण्याची गरज आहे. कुठल्याही आपत्तीनंतरचा सुरुवातीचा प्रतिसाद हा महत्वपूर्ण असतो. त्याला आपण कसा प्रतिसाद देतो यावर पुढील अनर्थ अवलंबून असतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे म्हणाले की, आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्यही आपत्तीच्या वेळी प्रशासनाला मिळण्याची गरज आहे. रेस्क्यु,रिलिफ आणि रिहॅबिलिटेशन हे तीन ‘आर’ आपत्तीचा सामना करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले.
‘आपदा मित्र’कार्यक्रमाविषयी…
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा ‘आपदा मित्र’ कार्यक्रम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. राज्य सरकारकडून याकरीता 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यामधून एकूण 500 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील विविध विषयावर 12 दिवसाकरीता निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 500 स्वयंसेवकांची विभागणी 5 बॅचेस मध्ये करण्यात येणार व प्रत्येक बॅच मध्ये 100 स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येणार आहे. 12 दिवस निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्ती संरचना, आपदा मित्राची आपती व्यवस्थापना मध्ये भूमिका, शोध व बचावकार्य, प्रथमोपचार आणि समूदाय मुल्यांकन, सर्पदंश संरक्षण आदी माहिती यादरम्यान दिली जाणार आहे.