जिल्ह्यात नगरपालिका हद्दीमध्ये तपासणी सुरू
नागपुर समाचार : नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या चार हजार शंभर शाळांमध्ये आज नायलॅान मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. जिल्ह्यामध्ये अनेक नगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. नागरिकांचाही या मांजाविरोधी अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
‘मी पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार नाही, आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. मकर संक्रांतीचा सण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवून साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नायलॅान मांजाची खरेदी व विक्री केली जाते. जिल्ह्यातील अनेक भागात या नायलॅान मांजामुळे गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. नागरिकांच्या तसेच पशु-पक्षी यांच्या जीविताला व आरोग्याला, पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यामुळे या नायलॅान मांजाचा वापर न करण्याविषयी शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.