“धर्मभास्कर” गौरविका ग्रंथाचे थाटात प्रकाशन
नागपूर समाचार : रात्र ही अंधाराचे प्रतिक असते. हा अंधःकार भेदून सूर्य तेजोमय होतो. तसेच, धर्म हा अज्ञानाचा अंधःकार भेदून जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देतो. शिवचरित्रकार सद्गुरूदास महाराजांनी हाच वसा अंगिकारला आहे. त्यामुळे संकेश्वर पीठाने त्यांचा केलेला ‘धर्मभास्कर’ गौरव हा अभूतपूर्व योग असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधूकरराव रा. जोशी यांनी बुधवारी येथे काढले.
निमित्त होते संकेश्वर पीठाच्या वतिने श्री सद्गुरुदास महाराज यांचा “धर्मभास्कर” उपाधिने झालेल्या गौरविका ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे. रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी व्यास सभागृहात हा सोहळा घेण्यात आला. त्यावेळी डॉ. जोशी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर गणेश्वरशास्री द्रावीड, मुकुंदकाका जाटदेवळकर, अमृताश्रम स्वामी, बालकदास महाराज, कंपाली पीठाचे आचार्य नारायण विद्या भारती, प्रज्ञा फडणवीस आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ज्ञान साधकाचा कसा गौरव करावा हे संकेश्वर पीठाकडून शिकण्यासारखे आहे, असे सुरूवातीलाच नमूद करीत डॉ. जोशी म्हणाले सद् गुरूदास महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर समर्थ रामदास स्वामी देखील चरित्रातून समाजापुढे मांडले. सबंध शिवचरित्र सूर्याप्रमाणे तेजस्वी, निर्मळ, पवित्र आणि पराक्रमी आहे. त्यामुळे सदगुरूदास महाराजांचा झालेला धर्मभास्कर गौरव अभूतपूर्व योग आहे.
यावेळी गणेश्वर शास्री द्रावीड म्हणाले, सद आचार हा धर्माचा पाया आहे. आजच्या अधर्म युगात विश्वाच्या कल्याणाची भाषा करणारा वैदिक हा जगाच्या पाठीवरील एकमेव धर्म आहे.
यावेळी मनोगत मांडताना जाटदेवळेकर महाराज म्हणाले, कोणत्याही वास्तूत पायाभरणीचे दगड कधी दिसत नसतात. पण म्हणून त्यांचे अस्तित्व नाकारता येत नाही. जीवनाच्या मंदिरासाठी अशी मजबूत पायाभरणी करणारे सदगुरूदास महाराज यांची धर्म भास्करच्या रुपात धेतलेली ही दखल सकारात्मकता आणि उत्साहाचे प्रतिक आहे. स्मिता महाजन यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन करून आभार मानले.
मुकुंदकाका यांचा लवकरच ्’प्रज्ञा प्रभात सूर्य’ने गौरव
सर्वांना सोबत घेऊन चालणे धर्माला अपेक्षित असते. वैदिक धर्माचे देखील हेच सूत्र आहे. त्यामुले मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचा लवकरच ‘प्रज्ञा प्रभात सूर्य’ सन्मानाने गौरव केला जाईल,अशी घोषणा यावेळी अमृताश्रम स्वामी यांनी केली.