83 हजार मतदारांची वाढ; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक
नागपुर समाचार : मतदारांनी संकेतस्थळावर भेट देवून मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे. त्यासोबतच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन लोकशाही बळकटीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
मतदार यादी प्रसिध्दीच्या दिवशी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी रमेश दलाल, अनंत पात्रीकर, बंडोपंत टेभुर्णे, प्रकाश बारोकर, अमित श्रीवास्तव, शर्मा, कमल नामपल्लीवार, अविनाश बढे, अरुण वनकर व उत्तम शेवडे उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या नागपूर जिल्हयाच्या अंतिम मतदार यादीची प्रत राजकीय पक्षाना देण्यात आली. बैठकीमध्ये मतदार यादीचे निरीक्षण केले असता मतदार यादीत खालील प्रमाणे मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.
9 नोव्हेंबर राजी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीपेक्षा 5 जानेवारी रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत मतदारांची संख्या 49 हजार 767 ने वाढली. तर दिव्यांग मतदार संख्या 744 ने वाढले. ओव्हरसीज व्होटर-1, 18 ते 19 वयोगटातील मतदार संख्येमध्ये 10 हजार 547 वाढ झाली. महिला मतदारांमध्ये 21 हजार 859 ने वाढ तर तृतीयपंथीमतदार संख्येत 64 ने वाढ अशी एकूण 83 हजार 9 मतदार यादीत वाढ झालेली आहे.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित असून या कार्यक्रमानुसार 9 नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात होती. 9 नोव्हेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला असून त्या अनुषंगाने दावे व हरकती स्विकारण्यात आले. 5 जानेवारी 2023 रोजी सर्व पदनिर्देशित ठिकाणी यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात आली असल्याचे माहिती देण्यात आली.