- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : सायबर सुरक्षेबाबत जागरुकता आवश्यक – डॉ. विशाल लिचडे

केवळ व्यापक प्रमाणावर जागरूकताच सायबर हल्ले, हॅकिंग समस्यांना आळा घालू शकते

नागपूर समाचार : सायबर सुरक्षेबाबत वारंवार चर्चा होत असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आता आपला देश डिजिटल होत असताना, शहरे देखील अधिक स्मार्ट होत आहेत, तेव्हा तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होणार हे उघडच आहे. तंत्रज्ञानाची ओळख करून घेताना आपण जागरूक आणि सतर्क होऊन सायबर स्मार्ट बनले पाहिजे असं मत सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व्ह (आय) प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. विशाल लिचडे म्हणाले. नागपूरच्या रेशीमबाग येथे आज पासून १५ जानेवारी पर्यंत कॉम्पेक्स 2023 टेक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे, याप्रसंगी ते व्यवसायिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत उपयुक्त अश्या सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रमांविषयी बोलत होते. 

व्यापक जनजागृतीमुळे सायबर हल्ले, हॅकिंगच्या समस्यांना आळा बसू शकतो, असे सांगताना ते म्हणाले की, आपल्या देशाला २०२५ पर्यंत ५ लाख सायबर सुरक्षा तज्ञांची गरज आहे आणि सध्या आपल्याकडे पन्नास हजारांहून कमी तज्ञ आहेत. सायबर सुरक्षेमध्ये व्यवसाय म्हणून मोठी क्षमता आहे. अधिकाधिक तरुणांना हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सॉफ्टसेन्सद्वारे सायबर ऑडिटिंग, प्रशिक्षण, सल्ला आणि इंटर्नशिप दिली जाते. सायबर सुरक्षा अतिशय संवेदनशील असल्याने योग्य केंद्रे, सरकारी संलग्न केंद्रे आणि राष्ट्रीय सुरक्षा डेटाबेसशी जोडलेली केंद्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही नागपूर पोलिसांच्या सायबर सेलशीही भागीदारी केली असून त्यांना सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये/प्रकल्पांमध्ये मदत केली आहे. सायबर हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आणि ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या नैतिक मार्गांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही शालेय स्तरावर सायबर सुरक्षा जागरुकतेमध्ये सक्रियआहोत, असेही ते म्हणाले.

डॉ.लिचडे यांनी सांगितले की, आपण दररोज मोबाईल, लॅपटॉपवरून विविध सेवा घेतो. सीसीटीव्हीचे निरीक्षण, बायोमेट्रिक्स, एटीएम, वायफाय डेबिट कार्ड नियमितपणे वापरले जातात. आर्थिक आणि इतर नुकसान टाळण्यासाठी आपण सुरक्षित आणि जागरूक असले पाहिजे. आम्हाला माहित असलेले तंत्रज्ञान हॅकर्सना देखील माहित आहे. म्हणून, सायबर सुरक्षेचे तपशील जाणून घेऊन सुरक्षित राहणे याला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. सायबर स्पेसमध्ये वावरताना तुम्ही नेहमीच तुमची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित केले पाहिजे आणि असे करताना तुम्ही एका प्रकारे देशाच्या सुरक्षेत योगदान देत आहेत असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *