72 व्या इंडियन फार्मास्युटिकल कॉंग्रेसचे उद्घाटन
नागपूर समाचार : भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगलीच ख्याती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे स्वस्त आणि दर्जात्मक उत्पादने तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे झाले तर आपल्या फार्मा उद्योगांमध्ये असलेल्या निर्यातीच्या अफाट क्षमतांचा विस्तार होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आजपासून सुरू झालेल्या 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी केले.
व्यासपीठावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. वेणुगोपाल सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉमिनिक जॉर्डन, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे अध्यक्ष, 72 व्या आयपीसीच्या स्थानिक आयोजन समितीचे मुख्य संरक्षक आणि मार्गदर्शक, एआयओसीडी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे, आयपीसीचे संरक्षक, एसीजी वर्ल्डवाइडचे अध्यक्ष (इंडिया), इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. टी. व्ही. नारायण, इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. पंकज बेक्टर, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. वडलामुडी राव, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन प्रतिनिधी, डॉ. जयंत चौधरी, अखिल भारतीय औषध नियंत्रण अधिकारी कॉन्फेडरेशन प्रतिनिधी अतुल कुमार नासा, भारत बायोटेक इंडियन फार्मा ग्रॅज्युएट्स असोसिएशनचे एमडी डॉ. कृष्णा एल्ला, एपीटीआयचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जे. उमेकर, एलओसी- 72 व्या आयपीसीचे संघटन सचिव श्री. अतुल मंडलेकर व सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ.चंद्रकांत डोईफोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, डॉ.प्रमोद खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, फार्मा उद्योगात रोजगार निर्मितीची क्षमता आहे आणि सामाजिक आर्थिक परिवर्तन देखील घडवून आणण्याची क्षमता आहे. विविध क्षेत्रातील अधिकाधिक लोकांना फार्मा क्षेत्राशी जोडण्यासाठी अधिकाधिक कृषी आधारित उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी व्यासपीठावर मान्यवरांना केले. उद्योगांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी देशात उपलब्ध होत असलेल्या प्रगत दळणवळण सुविधांचा वापर करण्यावरही गडकरी यांनी भर दिला.
डॉ. वेणुगोपाल सोमाणी म्हणाले, भारतीय उत्पादने जगातील सर्वाधिक परवडणारी आणि दर्जेदार उत्पादने आहेत. जेनेरिक औषधांबरोबरच नावीन्य ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी करून औषधे सर्वांना परवडणारी बनविण्याच्या संधी शोधता येतील. फार्मा उद्योगाने प्रॉडक्ट बेस मॉडेलपासून सर्व्हिस बेस्ड मॉडेलवर काम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. संशोधन आणि विकासाचा वेगवान दृष्टिकोन, स्वावलंबनासाठी स्थानिक बाजारपेठेचे बळकटीकरण, चांगल्या प्रवेशासाठी स्पर्धात्मक इको-सिस्टीम इत्यादींबद्दलही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, 72 व्या आयपीसीवरील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते प्रख्यात फार्मासिस्ट मंडळींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. गडकरी यांच्या हस्ते आयोजन समितीच्या सदस्यांचा सत्कारही करण्यात आला. प्रारंभी पारंपरिक दीपप्रज्वलन आणि विद्यापीठ प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.