‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग’ कांदबरी अभिवाचन कार्यक्रमाला मिळाली श्रोत्यांची दाद
नागपूर समाचार : ‘बोरीनागच्या कोळसाखाण कामगारांचे काळवणलेले शरीर, कायम अंधारात काम केल्याने सूर्यप्रकाश सहन न करू शकणारे निस्तेज खोल गेलेले डोळे’ या आणि अश्या जिवंत वर्णनाच्या सोबतीला कॅनवास वर व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांच्या चित्रांसह भावना संपन्न अभिवाचनाने व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे आयुष्य उलगडले. शेखर नाईक प्रॉडक्शन प्रस्तुत व राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठान आणि आधार आयोजित ‘व्हिन्सेंट व्हान गॉग’ हा कादंबरी अभिवाचनाचा कार्यक्रम आज मुंडले हॉल, अंध विद्यालय, साऊथ अंबाझरी मार्ग, नागपूर येथे आयोजित करण्यात आला. गिरीश परदेशी, धनेश जोशी, सई लिमये, सृजना कथलकर या सहभागी कलाकार अभिवाचकांनी दर्जेदार प्रस्तुती करून रसिक श्रोत्यांची दाद मिळावी.
व्हिन्सेंट व्हॅन गॉग ह्या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या जीवनावर आधारित ‘लस्ट फॉर लाईफ’ ही आयव्हीन स्टोन यांच्या मूळ इंग्रजी कादंबरीचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी मराठीत केला आहे त्याचे वाचन यावेळी करण्यात आले. व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचे आयुष्य चित्रमय होते. त्यांची चित्रे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. चित्रांसाठी अशा कलाकारांच्या नशिबी येणारे दारिद्रय, उपेक्षा, अपमान, एकटेपणा, तडफड, व्हिन्सेंट यांच्या पिसाट जगण्यातला विसावा, अशा अनेक बाबींवर ही कादंबरी प्रकाश टाकते. त्यांच्या आधुनिक चित्रकलेत काही विचारप्रवाहांचा उद्गाता दिसून येते. अशा या अवलिया चित्रकाराच्या आयुष्यावर आधारित अत्यंत भावनिक, रोमहर्षक कादंबरीचा चित्रमय लेखन व वाचन प्रवास कलाकारंनी अत्यंत ताकदीने प्रस्तुत केला.
व्हॅन गॉग यांच्या चित्रांसह या कादंबरीचे अभिवाचनाचा आगळावेगळा नाट्यानुभव रसिकांना घेता आला. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि दिग्दर्शन शेखर नाईक यांचे होते तर संगीत चैतन्य आडकर यांचे होते. प्रकाश योजना भूषण चौधरी यांची तर दृक्श्राव्य संयोजन प्रसाद कुलकर्णी यांचे होते. डॉ. अविनाश रोडे, शुभदा फडणवीस व हेमंत काळीकर कार्यक्रमाला उपस्थित होते.