नागपूर समाचार : बालसाहित्यिक भालचंद्र देशपांडे यांच्या ‘प्रदुषणाच्या राक्षसांचा नायनाट’ आणि ‘विज्ञानरंजक बालकथा’ या दोन बालकथासंग्रहांचे प्रकाशन वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पार पडले.
कार्यक्रमाला मुलांचे मासिकचे संपादक जयंत मोडक, व्यास क्रिएशनचे नागेश धावडे, श्रीकांत देशपांडे, अंजली देशपांडे, प्रतिमा भोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यास प्रकाशनतर्फे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 पुस्तकांचा बालसाहित्य खजिना संच तयार करण्यात आला असून मराठी भाषा दिनापासून पुढचे 75 दिवस ही 75 पुस्तके 1 हजार रुपयात बालवाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणात आहेत. या बालसाहित्य खजिना संचामध्ये भालचंद्र देशपांडे यांच्या पाच पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी दोन पुस्तकांचे प्रकाशन जयंत मोडक यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजाला चांगल्या बालसाहित्याची गरज असून व्यास प्रकाशनने अशी चांगली पुस्तके बालकांना वाचनासाठी उपलब्ध करून द्यावी, असे विचार जयंत मोडक यांनी व्यक्त केले. भालचंद्र देशपांडे यांनी पुस्तकांबद्दल माहिती दिली व बालकांनी ही पुस्तके अवश्य वाचावी, असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीकांत देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन व्यास क्रिएशन दीपक देशमुख यांनी केले.