- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आजपासून जिल्ह्यात जागरूक पालक सुदृढ बालक अभियान 

6 लक्ष 50 हजार बालकांची होणार तपासणी; डागा स्त्री रुग्णालयात आज महाआरोग्य शिबिर

नागपूर समाचार : जिल्ह्यात उद्या, दि. 9 फेब्रुवारीला महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने डागा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘जागरूक पालक सुदृढ बालक अभियान’ व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

9 फेब्रुवारीपासून पुढील 60 दिवस नागपूर जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांमधील शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील साडेसहा लक्ष मुलामुलींची तपासणी, आरोग्य विभागाच्या ग्रामीण व महानगरपालिका स्तरावर करण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेतून कोणताही लाभार्थी सुटू नये, आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया व उपचार आरोग्य संस्थांमार्फत निःशुल्क प्राप्त व्हावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

अभियानाचे यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि शालिनीताई मेघे रुग्णालय हिंगणा व लता मंगेशकर रुग्णालय डिगडोह यांचे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. संजय बिजवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे,डॉ. मेश्राम, डॉ. संदीप पाखमोडे शिक्षणाधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा, अंध व दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालगृहे, बाल सुधारगृहे, अनाथालय समाज कल्याण व आदिवासी विभाग वसतीगृह, खाजगी नर्सरी, बालवाड्या, खाजगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालय तसेच शाळाबाह्य शून्य ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुला- मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

खाजगी शाळांनी देखील यामध्ये हिरिरीने सहभागी व्हावे, कोणतीही कारणे सांगू नयेत. या अभियानापासून अलिप्त राहणाऱ्या शाळा संदर्भात गांभीर्याने कारवाई करण्यात येईल, असे निर्देश या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेतील रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत येणाऱ्या रुग्णांचा उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी (डायबेटिक रेटिनोपथी), सर्व प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित तपासणी, बाल आरोग्य इत्यादी संदर्भात आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यांतर्गत सर्व गरजू रुग्णांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *