वि सा संघाच्या कथा-पटकथालेखन कार्यशाळेचा समारोप
नागपूर समाचार : कथा पथकथा लेखनाचे तंत्र शिकून त्यात स्वतःची कथा आणि कल्पकता याचा समावेश करून उत्तम लेखन करा अश्या शुभेच्छा सुप्रसिध्द पटकथालेखक आणि अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त इब्राहीम अफगाण यांनी दिल्या. लेखनाच्या कार्यशाळेतून साहित्य क्षेत्राला नवीन लेखक मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने नवोदित लेखकांसाठी दोन दिवसीय पटकथालेखन कार्यशाळेच आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात करण्यात आले होते. या कार्यशाळेचा समारोप आज झाला त्यावेळी इब्राहीम अफगाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळांमधून सहभाग, संवाद आणि सहकार्यातून नवीन विषयांवर चर्चा व्हावी. प्रत्येकाने आपली विशिष्ट शैली आणि आवड ओळखून त्यात लिखाणाचा प्रयत्न करावा. आज जे शिकत आहेत त्यांनी पारंगत होऊन पुढे कार्यशाळा घ्याव्या असे देखील अफगाण यांनी सुचवले. कार्यशाळेत ३५ नवोदित लेखक आणि विद्यार्धी यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अफगाण यांनी सहज सोप्या शैलीत शिकवल्या मुळे सहभागींनी समाधान व्यक्त केले. सहभागींपैकी प्रा. वैशाली डोंगरे यांनी अफगाण यांच्यासाठी कविता सादर केली आणि पुन्हा पुन्हा अश्या कार्यशाळा वि सा संघाने घ्याव्या अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केला. यावेळी साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर आणि ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. विवेक अलोनी अलोणी यांनी केले.