नागपूर समाचार : ग्रामीण भागातील युवक, शेतकरी, कामगार आणि स्त्रिया अशा अनेकांच्या मानवी जगण्याच्या संवेदना व्यक्त करणाऱ्या कविता ‘वसंतोत्सव’ कविसंमेलनात ग्रामीण भागातून आलेल्या कवींनी सादर केल्या.
राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठान व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसंतोत्सव’ कविसंमेलनाचे शुक्रवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी आणि राम गणेश गडकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजितबाबू देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
अमरावतीचे प्रसिद्ध कवी पवन नालट, राजुराचे किशोर कवठे, दर्यापूरचे संघमित्रा खंडारे, चंद्रपूरच्या पद्मरेखा धनकर आणि सावनेरचे गणेश भाकरे यांनी या कविसंमेलनात भाग घेतला.
‘जगण्याला असू द्यावी थोडी तरी माती, अंधारल्या घरट्यात पेटू द्या रे वाती’ व ‘पण विठ्ठल काहीच बोलला नाही’ अशी काव्यपंक्तीतुन ग्रामीण भागातील परिस्थितीचे वर्णन किशोर कवठे यांनी केले. गणेश भाकरे यांनी देखील ‘पण’ आणि ‘विश्वास’ या कवितेतून माणसाच्या स्वभावावर प्रकाश टाकला. पद्मरेखा धनकर यांनी ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ या कवितेतून गुलामगिरीच्या जोखडातून स्वतःला मुक्त करत नव्या दिशेने झेपावणाऱ्या आधुनिक स्त्रीची कथा सांगितली. ‘स्मशानात फुलं वाचताना’ ही कविता सादर केली.
डॉ. संघमित्रा खंडारे यांनी काटेसरीच्या नाजूक झाडाची स्त्रीच्या स्वभावाशी तुलना करीत ‘काटेसरी – वेदनेच्या सलतनीची सम्राधणी’ ही कविता सादर केली. त्यानंतर त्यांनी ‘गुदमरून मग प्राणच गेला’ ही गझल व ‘ जगरहाट’ ही कविता प्रस्तुत केली. पवन नालट यांनी ‘बाईचं जगणं’ या कविता संगहातील दोन कविता व ‘कटेसरीचा देह’ या कविता सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. ग्रामीण भागातून आलेले हे कवी असून तेथील सद्यस्थिती त्यांच्या कवितेतुन प्रकट व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना डॉ गिरीश गांधी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रफुल्ल शिलेदार, श्याम धोंड, अनिल गडेकर, बाळ कुळकर्णी, डॉ आमले यांच्यासह डॉ अविनाश रोडे, आभा मेघे, हेमंत काळीकर यांची उपस्थिती होती. यावेळी कवयित्री स्वाती सुरंगळीकर यांचा सत्कार करण्यात आला. कवि संमेलनाचे सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अर्चना गुळगुळे यांनी केले.