26 ते 29 एप्रिल दरम्यान आयोजन, नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचा उपक्रम
नागपुर समाचार : धरमपेठ एज्युकेशन सोसायटीच्या नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरच्यावतीने वार्षिक कला प्रदर्शनी ‘चित्रार्थ – 2023’ चे 26 ते 29 एप्रिल 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. नटराज आर्ट गॅलरी, रजत महोत्सव बिल्डींग, धरमपेठ येथे आयोजित या प्रदर्शनीचे उद्घाटन 26 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ व माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला धरमपेठ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.
भारतीय कला, संस्कृतीचा प्रचार व प्रचार करण्याचा उद्देश असलेल्या या प्रदर्शनीची मध्यवर्ती संकल्पना ‘मोहेंजोदरो, हडप्पा आणि भारतीय संस्कृती’ ही आहे. नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरच्यावतीने पहिल्यांदाच अशा वार्षिक कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे. यात बीएफए व एमएफए अभ्यासक्रमाचे 110 विद्यार्थी अप्लाईड आर्ट, पेंटींग व स्कल्पचर आदी कला प्रदर्शित करतील.
भारतीय आदिम चित्रकला, अजंता-एलाराचे म्युरल्स, हडप्पा संस्कृतीची साक्ष देणारी डान्सिंग गर्ल या प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण राहणार आहे. ही कला प्रदर्शनी 26 ते 29 एप्रिल दरम्यान दुपारी 4 ते 8 यावेळेत सर्वांसाठी खुली राहणार आहे. कलाप्रेमींनी प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन धरमपेठ एज्युकेशन सोसायटीचे सचिव मंगेश फाटक, नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रविंद्र हरिदास व प्रदर्शनी प्रमुख प्रा. मौक्तिक काटे यांनी केले आहे.