- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : कलाश्री आर्ट फाऊंडेशनतर्फे ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ 

28 ते 30 एप्रिल दरम्‍यान विविध कार्यक्रमांचे आयोजन, कथ्थक गुरू पं. राजेंद्र गंगाणी यांची प्रस्‍तुती 

नागपूर समाचार : कला आणि संस्कृती क्षेत्रातील अग्रणी कलाश्री फाउंडेशनच्‍यावतीने ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ निमित्‍त २८ ते ३० एप्रिल २०२३ दरम्‍यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. बी. आर. मुंडले ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, उत्तर अंबाझरी रोड, दीक्षाभूमी चौक, नागपूर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथ्थक नर्तक व गुरू पंडित राजेंद्र गंगाणी यांची कार्यशाळा होणार आहे.

२९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ कथक गुरू व नृत्यांगना डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांच्‍यासह कथक क्षेत्रातील ज्‍येष्‍ठ गुरू मंडळी नृत्‍य सादरीकरण होणार आहे. त्यानंतर पंडित गुरू राजेंद्र गंगाणी यांच्‍या शिष्‍या प्रस‍िद्ध कथक नृत्‍यांगना नीलाक्षी खंडकर- सक्सेना एकल नृत्य प्रस्‍तुत करतील . त्‍यानंतर पंडित गुरु राजेंद्र गंगाणी यांचे सादरीकरण होणार आहे. कथक गुरू पंडित राजेंद्र गंगाणी हे जयपूर घराण्याच्या कथ्थक शैलीचे अग्रणी असून या क्षेत्रातील योगदानासाठी त्‍यांना २००३ साली राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार प्राप्‍त झाला आहे. मूळ नागपूरच्‍या पण सध्‍या दिल्‍लीत वास्‍तव्‍यास असलेल्‍या निलाक्षी खंडकर सक्सेना या पंडित राजेंद्र गंगाणी व कथक गुरू स्‍व. साधना नाफडे यांच्या शिष्या आहेत. सारंगीवादक नफीस अहमद व निशित गंगाणी यांची वाद्यसंगत लाभेल.

३० एप्रिल समारोपीय समारंभात कार्यशाळेतील विद्यार्थी प्रस्‍तुती देणार आहेत. यावेळी एनएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्‍या माजी कुलगुरू डॉ. शशीकला वंजारी यांची उपस्‍थ‍िती राहणार आहे. कार्यक्रम व कार्यशाळेचा कलाप्रेमींनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन कलाश्री फाउंडेशनचे अरविंद कुकडे, डॉ. रवींद्र हरिदास, सुधीर घिके, नीता काळे, डॉ. अपर्णा अग्निहोत्री, पूजा मुळे व सचिव डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *