नागपूर समाचार : डॉक्टरांचे योगदान समाजाकरिता तसेच गरिबांकरिता वाखणण्याजोगे आहे. गरीब रुग्णांमध्ये रोगांचे निदान करुन त्यावर वेळेत उपचार उपचार करणे हे अत्यंत महत्त्वाचे असून इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर शाखेची नवीन टीम यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले.
आयएमए- नागपूर शाखेच्या 2023-24 या वर्षाकरिता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. डॉ. वंदना काटे यांची आयएमए नागपूरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी ग़डकरी यांनी आयएमए- नागपूर शाखेच्या 2023-24 या वर्षाकरिता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
नागपूर हे खऱ्या अर्थाने हेल्थ हब झालेले आहे. डॉक्टरांनी ज्या चांगल्या सेवा दिल्या आहेत त्यामुळे ही विश्वसनीयता वाढलेली आहे. या क्षेत्रात फार मोठी क्षमता आहे. नागपुरातील शासकीय महाविद्यालय आणि मेयोच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम सुद्धा प्रस्तावित आहे.नागपुरात अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञानसंस्था –एम्स तसेच अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये केंद्र शासनाचे तसेच येथील डॉक्टरांचे योगदान आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
गरीब रुग्णांना एक्स-रे, सिटीस्कॅन यासारख्या सुविधा किफायतशीर दरात मिळावा याकरिता विशाखापट्टनम येथे मेडिकल डिव्हाईस पार्क मध्ये उत्पादने तयार केली जात आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.