‘धरमपेठ महिला’च्या कार्यालयाचे लोकार्पण
नागपूर समाचार : सहकार क्षेत्रात काही कारणांनी अनेक संस्था अडचणीत येतात; पण महिलांनी एकत्रितरीत्या धरमपेठ महिला मल्टी स्टेट सोसायटीची उभारणी करून नाव देशस्तरावर मोठे केले आहे.
सहकार क्षेत्रात या सोसायटीच्या महिलांची कामगिरी खरोखरच अभिमानास्पद बाब असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या शिवाजीनगर, रामनगर चौक येथील सीता राम भवनातील मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्घाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन, मुंबईचे उपाध्यक्ष वैशाली आवाडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीश (निवृत्त) वासंती नाईक, आ. परिणय फुके, संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा बावणे, मुख्य सल्लागार किशोर बावणे प्रामुख्याने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोहळ्याआधी कार्यालयाला भेट दिली. प्रास्ताविक नीलिमा बावणे यांनी केले. उपाध्यक्षा सारिका पेंडसे यांनी संस्थेची माहिती दिली. आभार अनघा मुळे यांनी मानले. चंद्रशेखर वसुले, प्रतापराय हिराणी, संस्थेचे संचालक, शाखांचे व्यवस्थापक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.