- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘करा हो नियमित योगासन’ म्हणत हजारो साधकांनी केले योगा प्रात्यक्षिके

जागतिक योग दिन कार्यक्रमाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर समाचार : योग साधनेने शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते. नियमित योगासनामुळे अनेक आजारांना दूर ठेवता येतात याबाबत जनजागृती करणारे ‘करा हो नियमित योगासन’ हे गीत म्हणत बुधवारी ( ता. २१) सकाळी हजारो योगसाधकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. ‘वसुधैव कुटुंबकम करिता योग’ या संकल्पनेवर आधारित व ‘हर घर – आंगण योग’ हे ब्रिदवाक्यासह नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्यासह आमदार प्रवीण दटके, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नासुप्र सभापती श्री. मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाने, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मुक्ता कोकड्डे, राष्ट़़ीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. नरेश वाडतकर, जनार्दन स्वामी योग्याभ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री. रामभाऊ खांडवे, नागपूर शहराचे एसडीओ श्री. हरीश भामरे यांच्यासह इतर मान्यवर व शहरातील विविध योगाभ्यासी मंडळ, मनपाचे अधिकारी कर्मचारी व हजारोंच्या संख्येत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामूहिक योगाभ्यास करून जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करीत केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले की, योगाचा प्रचार प्रसार व्हावा तसेच योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य उत्तम राहावे या भावनेतून जागतिक योग दिनाची सुरुवात झाली असून, दरवर्षी २१ जून हा दिवस मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगात साजरा केला जातो. असे सांगत श्री. गडकरी यांनी योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता सर्वांनी नियमित योगा करावा असे आवाहनही श्री गडकरी यांनी यावेळी केले. तर नागपुरात साजरा झालेल्या पहिल्या जागतिक योग दिनाच्या आठवणींनींना उजाळा देत श्री रामभाऊ खांडवे यांनी दैनंदिन जीवनातील नियमित योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधन केलेल्या एव्हीचे प्रसारण करण्यात आले. सामूहिक योगाभ्यास प्रारंभी योगवंदना झाली. यानंतर जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या चमूच्याने सामूहिक योगाभ्यासचे नेतृत्व करीत प्रार्थनेनंतर शिथिलीकरण अभ्यास आणि त्यानंतर विविध योगासने प्रातिनिधिक स्वरूपात करवून घेतली. त्यांच्यासोबत स्टेडियममध्ये उपस्थित हजारो साधकांनी ही सारी आसने केलीत. यावेळी प्रत्येक आसन संपल्यानंतर ‘करा हो नियमित योगासन’ या योग गीताच्या शब्दांनी यशवंत स्टेडियम दुमदुमले होते. प्रसन्न आणि निरामय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी तर आभार मनपाचे उपायुक्त श्री. सुरेश बगळे यांनी मानले. कार्यक्रमात मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, रविन्द्र भेलावे, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, महेश धामेचा, डॉ.विजय जोशी, शिक्षणाधिकारी राजेन्द्र पुसेकर सुध्दा प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध मंडळांचा सहभाग

जागतिक योग दिन कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्री रामचंद्र मिशन, प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, एन.सी.सी. ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नॅचरोपॅथी योग असोशिएनश, सहज योगध्यान केंद्र, योग सूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था, महिला पोलीस ट्राफिक सेल, आरपीएफ, सीआरपीएफ, एनडीआरएफ, एनएचएआई,आदींनी सहभाग नोंदविला.

खेलो इंडियाच्या खेळाडूंचा सत्कार

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ वाराणसी उत्तर प्रदेश येथे सहभाग नोंदविणाऱ्या व पदकप्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक प्राप्त सृष्टी शेंडे, कल्याणी चुटे, छकुली सेलोकर, अलिशा गायमुखे, रचना आंबुलकर, तर रजत पदक प्राप्त वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, वैभव देशमुख, प्रणय कंगाले, ओम राकडे यांचा समावेश होता.

चित्तथरारक प्रात्यक्षिके

जागतिक योगा दिननिमित्त घेण्यात आलेल्या सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात नागपूर जिल्हा योग असोशिएशनचे अनिल मोहगावकर व संदीप खरे यांच्या चमूने योगाचे विविध मानवीय मनोरे व कठीण योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे सादरीकरण करणाऱ्या संघात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता.

योगमय वातावरण

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.३० पासून यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या साधकांच्या गर्दीने धंतोली परिसरातील रस्ते फुलून गेले होते. यशवंत स्टेडियममध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक साधकावर पुष्पवर्षाव करण्यात आला. एका रांगेत शिस्तबद्ध रीतेने योगा करणाऱ्या साधकांच्या गर्दीने स्टेडियममधील वातावरण योगमय बनले.

यशवंत स्टेडियमवर रंगले श्वेत रंगात

योग दिनाच्या निमित्ताने स्टेडियममध्ये एकत्रित होणाऱ्या साधकांना धवल वस्त्र परिधान करून येण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले होते. त्यानुसार हजारोंच्या संख्येत धवल वस्त्र परिधान करून आलेल्या साधकांमुळे स्टेडियम पांढऱ्या रंगाने व्यापले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *