- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : डॉ. आशिष देशमुखांना घेऊन कुणबी समाजाला खूष करण्याचा भाजपचा प्रयत्न !

नागपूर समाचार : २०१९च्या निवडणुकीत भाजपमध्ये जे घडले, त्यामुळे पक्षाला मोठा फटका बसला. नागपूर जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या घटली. पण २०२४मध्ये भाजपला केंद्रात आणि राज्यात सत्ता पुन्हा आणायची आहे. त्यामुळे नेते कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीत. (In 2024, the BJP wants to regain power at the center and in the state) २०१९ मध्ये ऐन वेळी हेवीवेट नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना  उमेदवारी नाकारणे भाजपला चांगलेच महागात पडले होते. त्यामुळे तेली आणि कुणबी समाज भाजपवर चांगलाच उखडला होता. परिणामी भाजपला नागपूर शहर, जिल्हा, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात माघारी यावे लागले होते. कारण चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत, तर त्यांच्या पत्नी ज्योती या कुणबी समाजाची आहे.

बावनकुळेंनी उमेदवारी नाकारल्याने तेली समाज तर भाजपपासून दुरावलाच, पण जावयांची तिकीट कापल्यामुळे कुणबी समाजही भाजपवर नाराज झाला. त्यातच तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांचीही तिकीट ऐन वेळेवर कापण्यात आली होती. त्याचाही फटका भाजपला बसला. आज नागपूर जिल्ह्यात आमदार समीर मेघे वगळता दुसरा तोडीचा कुणबी नेता भाजपजवळ नाही. त्यामुळे डॉ. आशिष देशमुख यांना पक्षात घेऊन भाजपने कुणबी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजप ‘केटीएम’ फॉर्म्युल्याचा अवलंब करणार असल्याचे समजते. कुणबी, तेली आणि माळी हे तीनही समाज नागपूर जिल्ह्यात मोठ्‍या संख्येने आहेत. त्यामुळे आगामी नागपूर शहर आणि जिल्हाध्यक्ष तसेच कार्यकारिणीत स्थान देताना या जातींना प्राधान्य दिले जाणार आहे.

भाजपमध्ये नागपूर शहर अध्यक्ष आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सध्या जोरदार सुरू आहेत. अध्यक्ष बदलताना कुठलाही समाज नाराज होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. ग्रामीणमध्ये कुणबी समाजाची नाराजी भाजपला दूर करायची आहे. सध्या येथे अरविंद गजभिये जिल्हाध्यक्ष आहेत. त्यापूर्वी डॉ. राजू पोतदार होते. काटोल, सावनेर तसेच हिंगणा या विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे.

हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांचा अपवाद वगळता भाजपमध्ये कुणबी समाजाचा कुठलाही मोठा नेता नाही. काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्षात घेऊन भाजपने कुणबी समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. कुणबी समाजातील पोकळी दूर करण्यासाठी भाजपने दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना अरविंद गजभिये यांच्या मदतीला धाडले आहे. जिल्ह्याचे प्रभारी म्हणून कोहळे काम बघत आहेत.

सावनेर किंवा काटोल यांपैकी एका विधानसभेत गरजेनुसार निवडणुकीत त्यांचा वापर करायचा भाजपचे ठरवले आहे. मात्र त्यांना दक्षिण नागपूर अधिक प्रिय आहे. तिकीट द्यायचीच असेल तर दक्षिणेची द्या असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्टच सांगितले असल्याची माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप आता जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना प्रदेशाध्यक्ष करून भाजपने तेली समाजातील नाराजी यापूर्वीच दूर केली आहे.

नागपूरचे (Nagpur) शहराध्यक्ष प्रवीण दटके (Pravin Datke) यांनाही बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे. ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. अनेक वर्षांपासून मध्य नागपूरमधून उमेदवारी द्यावी, असा त्यांचा आग्रह आहे. यापूर्वी रामटेक आणि दक्षिण नागपूरमधून त्यांना उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्यांनी नकार दिला होता.

मुस्लिम आणि हलबाबहुल ही मध्य नागपूरची मोठी अडचण आहे. हलबा समाज भाजपसोबत (BJP) आहे. हलबा उमेदवार बदलल्यास मोठा फटका बसण्याची भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे आमदार विकास कुंभारे यांचे चांगलेच फावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *