आजपासून जिल्हयात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाला उत्साहात सुरूवात
नागपूर समाचार : आज हुतात्मादिनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ ते 30 ऑगस्टपर्यंतच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला सुरुवात केली त्यांनी हातात माती घेऊन उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना शपथ दिली आज जिल्हाभरामध्ये सर्व शासकीय कार्यालयात एकाच वेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली.
मेरी माटी मेरा देश या अभियानात भूमातेला वंदन तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता पंचप्रण निश्चित केले आहे. आज हुतात्मादिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी ‘पंचप्रण शपथ’ दिली.
‘भारतास वर्ष 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करतांनाच गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करून देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, तसेच नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू….’अशी शपथ त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती सन्मान म्हणून हातात माती घेवून ही शपथ घेण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर आयोजित विविध उपक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत शिलाफलक, वसुधावंदन अंतर्गत 75 देशी वृक्षांची लागवड करून अमृतसरोवर वाटिकांच्या परिसरात ध्वजारोहण, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन आदी उपक्रमाचीही सुरुवात झाली आहे.