नागपुर समाचार : नागपूर महानगरपालिकेने शासनाच्या निर्देशानुसार कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विना वातानुकूलित मंगल कार्यालय, लॉन, सभागृह येथे होणाऱ्या लग्न कार्यासाठी अनुमती प्रदान केली आहे. यासंबंधी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
महाराष्ट्र शासनाचे दि. २२ जून २०२० ला ‘मिशन बिगीन अगेन’ संबंधी निघालेल्या आदेशानुसार सोशल डिस्टंनसिंगमध्ये होणाऱ्या लग्न कार्यासंबंधीच्या आदेशात अंशतः सुधारणा करण्यात आली आहे. या आदेशानुसार गर्दी टाळण्यासाठी जास्तीत-जास्त ५० लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टंनसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह येथे लग्न कार्य करता येणार आहे.
यासाठी कोव्हिड-१९ संबंधी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टंनसिंग, मास्क लावणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, हँड सॅनिटायजरचा वापर करणे या सर्व सुरक्षा संबंधी नियमांची व्यवस्था करून व त्याचे पालन करूनच लग्न समारंभ पार पाडण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
लग्न कार्यासाठी नागरिकांना मनपाच्या संबंधित झोनमधून परवानगी द्यावी लागणार आहे. लग्नसमारंभासाठी ५० लोकांची परवानगी अनुज्ञेय असली तरी सार्वजनिक आरोग्याचे हितास्तव कमीत-कमी संख्या ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.