जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग शहिदांच्या घरी पोहोचला
नागपूर समाचार : देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहिदांच्या परिवाराची आस्थेने विचारपूस करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज अनेक घरात बलिदानाच्या गाथा ऐकायला मिळाल्या. तर काही ठिकाणी ज्येष्ठांचे अश्रू अनावरही झालेले पाहायला मिळाले. ‘माझी माती माझा देश’ (मेरी माटी मेरा देश) या अभियानात वीरांचे वंदन उपक्रमात जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराला आज अशा भावनिक अनुभवांची अनुभूती घेता आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. आजचा दिवस शहिदांना वंदन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी शहिदांच्या घरी जावे त्यांचा बलिदानाच्या गाथा ऐकाव्यात तसेच त्यांच्या कुटुंबियांना वंदन करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात हा उपक्रम शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आला.
जिल्ह्यातील 18 शहिदांच्या घरी विद्यार्थी आपल्या शिक्षकांसोबत पोहोचले. शिक्षकांनी शहिदांबद्दल मिळवलेली माहिती आणि प्रत्यक्ष शहिदाच्या कुटुंबाकडून ऐकलेली माहिती अशा देशभक्तीने भारलेल्या गाथा ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना या अभियानातून मिळाली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा यांनी या भेटीवर आधारित पुस्तक तयार करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहे. कुटुंबाने सांगितलेली माहिती, तसेच शहिदाबद्दल उपलब्ध असणारी माहिती याचे संकलन करून पुढच्या पिढीसाठी चांगले दस्तऐवज तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला या संदर्भातील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. आज जिल्हाभरात अनेक शहिदांच्या कुटुंबाने प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. आमची मुलं, कुटुंबातील सदस्य देशासाठी शहीद झाले. आज शासनाचे कर्मचारी व विद्यार्थी आमच्या घरी आलेत. आम्हाला खूप छान वाटले अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शासनाने या उपक्रमातून अनेक कुटुंबांना त्यांच्या दुःखातून सावरण्यासाठी मदत केली. तसेच आपले कुटुंब आपल्या कुटुंबातील शहिदांमुळे ओळखले जाते, त्यामुळे आमची वेगळी प्रतिष्ठा आहे, याची जाणीव समाजाला करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी यावेळी शहीद परिवारातील सदस्यांचा सन्मानही केला. त्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘माझी माती माझा देश’, या अभियानामुळे व त्यातील विविधांगी उपक्रमामुळे गावागावात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होत वातावरण निर्मिती केली आहे.