‘वसुधैव कुटुंबकम्: एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा राहिल अधिवेशनाचा मुख्य विषय
देशभरातून एक हजाराहून अधिक प्रतिनिधी होतील सहभागी
नागपुर समाचार : अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेचे 60 वे अधिवेशन 9 आणि 10 सप्टेंबर रोजी वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम: एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा संमेलनाचा मुख्य विषय असेल. अधिवेशनात देशभरातील राज्यशास्त्राचे अभ्यासक सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्या अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता विद्यापीठाच्या निराला सभागृहात होणार आहे. अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांनी शुक्रवारी नागपूर येथील प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.लेल्ला कारुण्यकरा स्वागतपर भाषण करतील. अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेचे सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष व महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ, मोतिहारी (बिहार) चे माजी कुलगुरू डॉ. संजीवकुमार शर्मा अहवाल सादर करतील.
यानिमित्ताने ‘भारताचा अमृतकाल’, ‘मधुकरश्याम चतुर्वेदी स्मृती व्याख्यान’, सोबतच समांतर ज्ञान सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. या अधिवेशनात देशभरातील विविध विद्यापीठे, महाविद्यालये आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमधील एक हजाराहून अधिक शिक्षक आणि संशोधक सहभागी होणार आहेत. यात वर्तमान आणि माजी कुलगुरू सुद्धा भाग घेतील.
प्रो.लेल्ला कारुण्यकरा यांनी सांगितले की अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात भारतीय उच्च अध्ययन संस्था, शिमला, हिमाचल प्रदेशाचे माजी अध्यक्ष आणि महाराजा गंगा सिंग विद्यापीठ, बिकानेर (राजस्थान) च्या माजी कुलगुरू प्रो. चंद्रकला पाडिया आणि मद्रास विद्यापीठ, चेन्नई (तामिळनाडू) चे माजी कुलगुरू, अतिथी म्हणून प्रो. आर. तांडवन, ब्रम्हकपूर (ओडिशा) च्या कुलगुरू प्रो. गीतांजली दास आणि महाराजा गंगा सिंग विद्यापीठ, बिकानेर (राजस्थान) चे कुलगुरू प्रो. मनोज दीक्षित उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रीय पारितोषिक वितरणही होणार आहे. आभार प्रदर्शन हिंदी विद्यापीठाच्या भाषा विद्यालयाचे अधिष्ठाता आणि संमेलनाचे स्थानिक आयोजन सचिव प्रो. कृष्ण कुमार सिंग उपस्थित राहणार आहेत.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कुलगुरू प्रो. लेल्ला कारुण्यकरा, आयपीएसएचे कोषाध्यक्ष आणि सरचिटणीस प्रो. संजीवकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. परिषदेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधींच्या निवासाची व्यवस्था विद्यापीठाची अतिथीगृहे व वसतिगृहांसह वर्धा शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे.
1938 मध्ये झाली आयपीएसएची स्थापना
आयपीएसएचे कोषाध्यक्ष व सरचिटणीस प्रो.संजीव कुमार शर्मा म्हणाले की इंडियन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन (IPSA) ही भारतातील राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासनातील शिक्षक आणि विद्वानांची सर्वोच्च, जुनी आणि सर्वात मोठी शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्था आहे. ही एक राष्ट्रीय संस्था नोंदणीकृत संस्था आहे. आयपीएसएची उद्दिष्टे राज्यशास्त्राची प्रगती करणे राजकारणाचा शास्त्रीय अभ्यास; ज्ञानाचा प्रसार अशी आहे.
ते म्हणाले की भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांच्या सल्ल्यानुसार आणि आमंत्रणावरून डिसेंबर 1938 मध्ये वाराणसी येथे इंडियन पॉलिटिकल सायन्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. पंडित गोविंद बल्लभ पंत, संयुक्त प्रांताचे (आताचे उत्तर प्रदेश) तत्कालीन पंतप्रधान, यांना आयपीएसए च्या उद्घाटनाच्या अध्यक्षतेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. असोसिएशन सुरू करण्याची गरज खूप दिवसांपासून जाणवत होती आणि प्रत्यक्षात मे 1938 मध्ये निर्णय घेण्यात आला.
ऑगस्ट 1938 च्या उत्तरार्धात एक परिपत्रक जारी करण्यात आले, ज्यामध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना या शुभ प्रवासात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. 22 ते 24 डिसेंबर 1938 या कालावधीत वंदे मातरमच्या गायनाने आयपीएसएची पहिली परिषद झाली. बीएचयू कुलगुरू पंडित मदन मोहन मालवीय यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले आणि त्यांना देशासमोरील महत्त्वाच्या राजकीय समस्यांबद्दल माहिती दिली.
महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कार्यस्थळी होणारे आयपीएसए चे हे 60 वे सत्र आहे. यापूर्वी चेन्नई, म्हैसूर, जयपूर, कोलकाता, मेरठ, लखनौ, हैदराबाद, जोधपूर, आग्रा, अलिगड, पुणे आणि उज्जैन येथे आयपीएसची सत्रे पार पडली. दरवर्षी नियमितपणे याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय राजनीति विज्ञान शोध पत्रिका’ हे आयपीएसए द्वारे द्वैवार्षिक प्रकाशित केले जाते.
पत्रकार परिषदेत संमेलनाचे स्थानिक आयोजन सचिव प्रो.कृष्णकुमार सिंग, सहसचिव डॉ.के. बालराजू, जनसंवाद विभागाचे प्रमुख प्रो. कृपा शंकर चौबे, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, स्थानीय आयोजन संपर्क व प्रोटोकॉल अधिकारी राजेशकुमार यादव, प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रदीप मैत्र उपस्थित होते.