तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या रुग्णालयांना भेटी; जिल्हाधिका-यांच्या आदेशावरून पाहणी
नागपूर समाचार : जिल्ह्यातील सर्व तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी आज आपल्या अखत्यारीतील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देत पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या निर्देशावरून ही पाहणी करीत अहवाल सादर करण्यात आला.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 13 तालुका आरोग्य केंद्र, 11 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 53 प्राथमिक आरोग्य केंद्र, 316 उपकेंद्र असा मोठा विस्तार आरोग्य यंत्रणेचा आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आज संबंधित तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी पाहणी केली. रुग्णालयाची स्वच्छता व रुग्णांच्या सोई-सुविधा, औषधांचा साठा, मनुष्यबळाची उपलब्धता, रुग्णांची विचारपूस करीत पाहणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सायंकाळी सादर करण्यात आला.
जिल्ह्यातील तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयांची पाहणी केली. यात रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांनी ग्रामीण भागातील रुग्णालयातील औषध साठ्यांबाबत निश्चिंत असावे. प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य ग्रामीण रुग्णालयात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांबाबत विश्वास ठेवावा. नागरिकांनी आरोग्य सुविधा घेण्यासाठी खात्रीलायक इलाज म्हणून शासकीय वैद्यकीय यंत्रणेलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी कामठी व अन्य ठिकाणी आकस्मिक भेटी दिल्या होत्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात आकस्मिक भेटी दिल्या आहेत. आरोग्य यंत्रणेतील आवश्यक सुधारणा व मनुष्यबळ वाढविण्याकडेही लक्ष वेधले आहे.
तत्पूर्वी, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुषंगाने नुकतेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन आरोग्य यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले होते. त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करून आरोग्य यंत्रणेची माहिती माध्यमांना देण्यात आली होती.