नागपूर विद्यापीठ ते झिरो माईलपर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गाचा नामकरण सोहळा थाटात संपन्न
नागपूर समाचार : माहेश्वरी भवन, टेकडी रोड पासून जमिनीच्या खाली एक भुयारी मार्ग निर्माण करण्यात येणार असून आणि तो मार्ग थेट विद्यापीठ पर्यंत जाईल.या ८० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक भुयारी मार्गाचे काम मंजूर झाले असून त्याला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.
युवकांचे प्रेरणास्थान स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते झिरो माईलपर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यात आले. त्या नामकरण सोहळ्यात गडकरी यांनी ही घोषणा केली.
या नव्याने तयार होणाऱ्या भुयारी मार्गाचे काम मेट्रो ला दिले असून काही दिवसात कामाला सुरवात होईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मंचावर मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, जन्मशताब्दी समारोह आयोजन समितीचे सचिव अजय संचेती, विजयजी डिडोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डिडोळकर भुयारी मार्गामुळे त्यांची आठवण कायम राहील. वर्षभर डिडोळकरांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रम आयोजिण्यात येत आहे. त्यांच्या सारख्या निस्पृह, निस्वार्थी, समर्पित आणि महान नेत्याचे विचार कायम मार्गदर्शक राहतील, असे गडकरी म्हणाले. गडकरी पुढे म्हणाले की या भुयारी रस्त्याने पूर्व, उत्तर आणि दक्षिण नागपूरला उर्वरित नागपुरला पश्चिम नागपूरशी जोडण्याची सोय होईल. विद्यापीठ आणि सायन्स कॉलेजच्या मधला चौक आणि झिरो माईल चौक याला सुद्धा री-डिझाईन करण्यात येणार आहे. झाशीराणी चौक ते वाडी पोलीस स्टेशन सिमेंट काँक्रीट रस्ता आणि तिथे होणाऱ्या उड्डाण पुलाला स्व. श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय पायाभूत सुविधांच्या २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा त्यांनी यावेळी केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस कार्यक्रमाला न येऊ शकल्याने त्यांनी पुण्यतिथी निमित्त दत्ताजींना अभिवादन केल्याचे गडकरी यांनी सांगितले.
त्यांनतर दत्ताजींच्या कुटुंबीयांचा हृद्य सत्कार यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी दत्ताजी डिडोळकर यांचे म्युरल तयार करणारे कलाकार संजय गर्जलवार यांचा देखील सत्कार गडकरी यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाला आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, माजी महापौर अनिल सोले, दयाशंकर तिवारी, जन्मशताब्दी समारोह आयोजन समिती व समारोह समितीच्यावतीने अध्यक्ष अॅड. सुनील पाळधीकर, उपाध्यक्ष आ. डॉ. रामदास आंबटकर, सचिव डॉ. मुरलीधर चांदेकर, विनय माहूरकर, , डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. अनिल सोले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन्मशताब्दी समितीचे सह-सचिव जयंत पाठक यांनी केले. राष्ट्रीय व्यक्तिमत्व असलेल्या दत्ताजींच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू त्यांनी दत्ताजी यांच्या सोबतचे अनुभव सांगताना उलगडले. विद्यापीठात दत्ताजींची प्रदीर्घ कारकीर्द आणि सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान याबाबत त्यांनी माहिती दिली. आभार प्रदर्शन महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी केले.