- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पात्र लाभार्थ्यांनी ‘आयुष्मान भारत कार्ड’ काढावे – जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर

घोराड व वारोडा गावाला भेट ; प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली

नागपूर समाचार : जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज केले. तसेच, आयुष्मान भारत कार्डपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, अशा सूचना शासकीय यंत्रणेला दिल्या. त्यांनी आज कळमेश्वर तालुक्यातील घोराड आणि वारोडा गावाला भेट देऊन आयुष्मान भारत कार्ड संदर्भातील स्थिती जाणून घेतली.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (PMJAY) आर्थिक मागास घटकांकरिता आयुष्यमान भारत योजना देशभरात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांचे ‘आयुष्यमान भारत कार्ड’ बनविले जात असून चिन्हीत हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध होत आहे.

घोराड ग्रामपंचायत आणि वारोडा येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संगणकावर आयुष्मान भारत कार्ड साठी करावयाचा अर्ज आणि त्याचे विविध टप्पे जाणून घेतले. या कार्यात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर तोडगा काढण्या संदर्भातही त्यांनी सूचना केल्या. घोराडच्या संरपंच पिंकी सय्याम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले, तहसिलदार रोशन मकवाने, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपा कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

जिल्‌हाधिकाऱ्यांनी वारोडा आरोग्य वर्धिनी केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, दवाखाना आपल्या दारी आणि आयुष्मान भव मोहिमेचा आढावा घेतला. या योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. गटविकास अधिकारी, ग्राहक सेवा केंद्र ,आशा वर्कर यांनी समन्वयातून कार्य करून आयुष्मान भारत कार्ड काढण्याच्या कामाला गती देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. 

ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक मागास कुटूंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा या कार्डच्या माध्यमातून मिळतो. वर्ष 2011च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील 13 लाख लाभार्थी आयुष्मान भारत कार्डसाठी पात्र आहेत. यापैकी 4 लाख 68 हजार 25 लाभार्थ्यांना हे कार्ड बनविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *