विविध विषयांचा घेतला आढावा
नागपूर समाचार : नदी, नाल्यांच्या पूर विसर्गामुळे घरे, रस्ते, लोकवस्ती, कारखाने, उद्योग, शेत जमिनी इत्यादी पाण्याखाली बुडतात. नदीच्या कमी वहन क्षमतेमुळे पुराचा कालावधीही वाढतो. त्यामुळे होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी नद्यांच्या वहन मार्गातील अडथळे दूर करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील नद्यांची वहन क्षमता पुनःस्थापित करण्यासाठी निश्चित करण्यात आलेले धोरण व कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार प्रत्यक्ष तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्यातील नागरी व शहरी क्षेत्राच्या लगत वाहणाऱ्या नद्यांची वहन क्षमता पुनःस्थापित करण्याची धोरण व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील कन्हान, वेन्ना, नंद, नाग व जाम या पाच नद्यांचा समावेश आहे. यादृष्टीने या नद्यांच्या वहन क्षमता पुनःस्थापित होण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आयुष्मान भारत, जलयुक्त शिवार या विषयांचा थोडक्यात आढावा घेत कामांना गती देण्याचे निर्देश दिले.