नागपूर समाचार : विदर्भातील उद्योगांचा विकास व्हावा, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) च्या कार्यकारिणीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली.
एडचे अध्यक्ष आशिष काळे व सचिव डॉ. विजय शर्मा यांनी संयुक्तरित्या, देवेंद्र फडणवीस यांना ‘एड’ स्थापन करण्यामागच्या उद्देशाबद्दल अवगत केले. ‘एड’च्यावतीने जानेवारी 2024 मध्ये नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सव ‘अॅडव्हांटेज विदर्भ’चे आयोजन करण्यात येणार असून त्यात विदर्भातील खासदार, आमदार आणि उद्योजकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. बिझनेस कॉन्क्लेव्ह, विविध कार्यशाळा, परिषदा आणि वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रामसह, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, इन्व्हेस्टर मीटचे आयोजन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय, विदर्भातील उद्योजकांच्या यशोगाथांचे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील औद्योगिक विकासासाठी राबविण्यात येणा-या या उपक्रमाचे कौतुक केले आणि महाराष्ट्र सरकार त्याकरीता संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना या उपक्रमामध्ये जातीने लक्ष घालण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. विदर्भात भविष्यात जे औद्योगिक प्रकल्प येतील त्यांचे स्वागत केले जाणार असून त्यांना शासनातर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी एडचे उपाध्यक्ष प्रणव शर्मा व गिरीधारी मंत्री तसेच, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, डॉ. महेंद्र क्षीरसागर, प्रदीप माहेश्वरी, प्रशांत उगेमुगे, अविनाश घुशे यांची उपस्थिती होती.