नागपूर समाचार : नागपूरसह मध्य भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव यावर्षी साजरा होणार आहे. यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूर येथे 1 डिसेंबर 2023 रोजी येणार असून नागपूर प्रशासन यासाठी तयारीला लागले आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व अधिष्ठाता राज गजभिये यांच्या उपस्थितीत आज वैद्यकीय महाविद्यालयात या संदर्भातील बैठक पार पडली.
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, इंडियन सायन्स कॉग्रेस, जी-20 या तीन मोठ्या आयोजनानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाचा मोठा कार्यक्रम नागपूरमध्ये होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मध्य भारतातील आरोग्य व्यवस्थेचे केंद्र असलेल्या मेडिकलचा कायापालट करणे सुरु आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळ, मेडिकलच्या आसपास सुरु असलेली दुरुस्तीची कामे, अतिक्रमण तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, शासनाकडे प्रस्ताव सादर करणे आदीं संदर्भात सूचना केल्या तसेच कार्यक्रमस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.