नागपूर समाचार : पांढ-या फ्रेमचा काळा गॉगल, गुळगुळीत टक्कल, चट्टयापट्याचे स्टाईलिश कपडे अशा अवतारात मंचावर अवतरलेल्या गायक, गीतकार परफॉर्मर बेनी दयालचे एक एक गाणे युवकांच्या अंगात ‘नशेसी चढ गई’ सारखे भिनत गेले आणि संपूर्ण पटांगण ‘नाचो नाचो’ म्हणत नाचू लागले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज सातवा दिवस होता. बेनी दयाल यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट सारखी युवकांची चांगलीच गर्दी केली होती. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, एनएमसीचे प्रशासक अभिजीत चौधरी, जीएसटीचे सहआयुक्त संजय बंगारतले, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, विभागीय माहिती आयुक्त राहूल पांडे, मणिकांत सोनी, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ. संजीव चौधरी यांच्या उपस्थिती दीपप्रज्वलन करण्यात आले.
बेनीचे ‘जो चाहे उल्फत हो गया’ या गीतासह मंचावर आगमन झाले. त्यानंतर त्याने ‘जिंदगी सितार हो गई’ हे गाणे सादर केले. ‘कैसे मुझे’, ‘तु मेरी दोस्त है’ अशा एका-एका गाण्यासह युवकांमध्ये उत्साह संचारत गेला. बसलेले लोक ‘इन्ना सोणा क्यू रब ने बनाया’, ‘दिल की यही खता है’ या गाण्यांसाठी जागीच उभे राहिले आणि ‘साथ हम चले’, नशेची चढ गई , ‘आदत से मजबूर’, ‘जादू होने को है’, या गाण्यावर थिरकू लागले. संगीताची नशा नंतर इतकी भिनत गेली की ‘के घुंगरू टूट गये’ म्हणत युवावर्गाने बेधुंद नृत्य केले. ‘चल छय्या छय्या’, ‘बत्तमीज दिल’ सारखी गाणी सादर करून बेनी दयाल ने युवकांना वेड लावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.