- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मनाला भिडणारी पियुष मिश्रा यांची ‘बल्‍लीमारान’ प्रस्‍तुती

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आठवा दिवस 

नागपूर समाचार : गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेते पियुष म‍िश्रा यांनी ‘बल्‍लीमारान’ च्‍या माध्‍यमातून समाजाच्‍या परिस्थितीवर कधी परखड, कधी विनोद शैलीत तर कधी भावनिक भाष्‍य करणा-या कविता आपल्‍या खास शैलीने सादर करून रसिकांना मंत्रमुग्‍ध केले. 

दिल्‍लीत म‍िर्झा गालीब जेथे राहायचे, त्‍या ठ‍िकाणाच्‍या नावावरून प्रेर‍ित होऊन पियुष मिश्रा यांनी ‘बल्‍लीमारान’ हा बँड तयार करून थेट हृदयाचा ठाव घेणारी गाणी सादर करण्‍याची स्‍वतंत्र शैली तयार केली असून ती देशविदेशात बरीच लोकप्रिय झाली आहे. परिस्‍थ‍ितीवर थेट भाष्‍य करणा-या या शैलीला विशेषत: तरुणाईने डोक्‍यावर घेतले आहे. खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या आज आठव्‍या दिवशी त्‍याची प्रचिती आली. आजच्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्‍ट्र टाईम्‍सचे संपादक श्रीपाद अपराज‍ित, खा. कृपाल तुमाने, प्रविण दटके, परिणय फुके, नागो गाणार, विकास महात्‍मे, आशीष जयस्‍वाल, पियुष म‍िश्रा यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलनाने झाले. यावेळी पियुष म‍िश्रा व अरुणा भिडे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. 

सुरुवातीला पियुष म‍िश्रा यांनी ‘उस रात शहर में खून की बारीश आयी रे’ या काव्‍यातून आजच्‍या गंभीर परिस्थितीवर भाष्‍य केले आणि वातावरण गंभीर केले. आताशा लोक जुन्‍या कथा, कहाण्‍या, गाणी विसरले असून त्‍यातला आनंद गमावला आहे. थोडे थांबून श्‍वास घेऊन परत एकदा त्‍या जुन्‍या आठवणी ताज्‍या करा, असे म्‍हणत ‘थोडा नजारा, चटपट बाते, यही कहानी, आते-जाते’ हे गीत सादर केले. त्‍यानंतर ‘डेन्‍मार्क के हालातों में…’ हे मजेशीर गीत सादर केले. आपला देश कन्‍फयूज हॅम्‍लेटचा बिघडलेला डेन्‍मार्क झाला नाही, याचा आनंद असल्‍याचे त्‍यांनी या कवितेतून सांग‍ितले आहे.

‘वो सुहाने दिन, आशिकाने दिन’ या गीतातून तारुण्‍यातील रोमँटिक दिवसांच्‍या आठवणी ताज्‍या केल्‍या. विशाल भारद्वाजने लिहिलेले गीत ‘कही पे लडकी जाए लुडकी’, मुंबईवर आधारित ‘रात है नशे में’, ‘नवी चवन्‍नी’, ‘एक बगल में चांद होगा’ अशी अनेक गीते त्‍यांनी यावेळी सादर केली व रसिकांना आनंद दिला. रसिकांकडून ‘हुस्‍न’, ‘आरम्‍भ’ या गीतांची वारंवार मागणी होती. ती त्‍यांनी पूर्ण केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी, रेणुका देशकर व अभ‍िजीत मुळे यांनी केले. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे. 

महोत्‍सवातून सांस्‍कृतिक मूल्‍यांचे जतन – नितीन गडकरी 

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवातून प्रबोधन, प्रशिक्षण, संस्‍कार आणि मनोरंजन असा योग साधला जातो. यावर्षी आध्‍यात्मिक उपक्रमांनादेखील नागरिकांचा उत्‍तम प्रत‍िसाद लाभला. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा अंग‍िकार करून केलेली आर्थिक प्रगती म्‍हणजेच देशाचा विकास नसून सांस्‍कृतिक प्रगतीपण होणे आवश्‍यक असते. त्‍यासाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव असून त्‍यामाध्‍यमातून सांस्‍कृतिक मूल्‍यांची जोपासना होते आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केले. 

स्‍थानिक कलाकारांना म‍िळाला मंच – देवेंद्र फडणवीस

नितीन गडकरी यांनी नागपूर व विदर्भाला क्रीडा आणि सांस्‍कृतिक असे दोन अतिशय महत्‍वाचे महोत्‍सव दिले आहेत. विदर्भातील कानाकोप-यातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा सहभाग या महोत्‍सवांमध्‍ये बघायला मिळतो आहे. महत्‍वाचे म्‍हणजे देशातले उत्‍तमातले उत्‍तम कलाकार येथे आपली कला सादर करत असताना स्‍थानिक कलाकारांना आपले कलागुण प्रस्‍तुत करण्‍याची संधीही याच मंचावर उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानतो, असे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. त्‍यांनी देशाच्‍या संघर्षाचा अँथम तयार करणारे पियुष म‍िश्रा यांचेही कौतुक केले. 

सर्वांगीण विकासात गडकरींचे योगदान मोठे – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

राज्‍याच्‍या उपराजधानीत राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरचे कलावंत येतात. विदर्भातले नागपूरमधले स्थानिक कलाकार हजारोच्‍या संख्‍येने या व्‍यावसायिक कलावंतांसोबतच आपली कला या मंचावर सादर करतात. हा सांस्‍कृतिक महोत्‍सव नागपुरात सुरू केल्‍याबद्दल नितीन गडकरी यांचे धन्‍यवाद व्‍यक्‍त करतो. राज्‍य व देशाच्‍या सर्वांगीण विकासात नितीन गडकरी यांचे योगदान मोठे आहे, असे मत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्‍यक्‍त केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *