नागपूर समाचार : अल्पावधीतच तरुणाईच्या हृदयात स्थान पटकावणारी व अनेक पुरस्कार आपल्या नावावर करणारी बॉलिवुडची सर्वाधिक डायनॅमिक संगीतकार जोडी सचेत आणि परंपराने आपल्या धमाकेदार गाण्यांनी नागपूरकरांना चार्ज केले. ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालयाचे भले मोठे पटांगण सचेत-परंपराला ऐकण्यासाठी तुडूंब भरले होते.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आज दहावा दिवस होता. आजच्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचनताई गडकरी, नवभारतचे सीएमडी निमिष माहेश्वरी, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य शारदा नायडू, डीसीपी विजयकांत सागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
‘सिने से तेरे सर को लगा के’ या गीताने सचेत-परंपराने धमाल करायला सुरुवात केली. ‘कसं काय नागपूर तुम्ही कसे आहात’ असा मराठीत नागपूकरांशी संवाद साधत या जोडीने सुरुवातीला रसिकांची मने जिंकली. इतके लोक आम्हाला ऐकायला येतील असे माहिती नव्हते. आजची लाईव्ह कॉन्सर्ट आमच्या आयुष्यातील सर्वाधिक उत्कृष्ट ठरेल असे म्हणत दोघांनी ‘हो गये हम और तुम एक’, ‘मेरे सोनिया सोनिया’, ‘फकिरा’ अशा प्रचंड लोकप्रिय गाणी सादर करून धमाल केली. मैय्या मैनु, मलंग सजना, शिव तांडव, राम सिया राम यांसारखी या जोडीच्या वेगवेगळ्या धाटणीच्या गाण्यांवर रसिकांनी धूम नृत्य केले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.