खासदार सांस्कृतिक महोत्सवातील ‘जागर भयक्तीचा’ चा भव्य समापन
नागपूर समाचार : ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण विद्यालयाचे पटांगण मंगळवारी सकाळी विविधरंगी गणवेश परिधान केलेल्या शाळकरी मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते. 83 शाळांतील 7000 हून अधिक विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘मनाचे श्लोक’ चे पठण करून मन:शांतीचा परिचय दिला.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जागर भक्तीचा’ या उपक्रमाचा भव्य असा समापन सोहळा आज मुख्य मंचावर ‘मनाचे श्लोक’ च्या सामूहिक पठणाने पार पडला. समर्थ रामदास स्वामी रचित ‘मनाचे श्लोक’ द्वारे बालमनावर संस्कार व्हावे, या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेने विद्यार्थ्यांना खासदार सांस्कृतिक महोत्सवात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह संघचालक श्रीधरराव गाडगे, खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, पंडित बच्छराज व्यास शाळेच्या उपप्रधानाचार्य रेणुका खळतकर, कुमार शास्त्री, देवेन दस्तुरे, बाळासाहेब कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला.
विविध शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींनी मंचावरून श्लोक पठणाला सुरुवात केली. त्यामागून विद्यार्थ्यांनी एका सुरात या श्लोकांचे पठण केले. ‘मनाचे श्लोक’ मध्ये एकुण 205 श्लोक असून त्यापैही पहिल्या ५१ श्लोकांचे यावेळी पठन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रुती देशपांडे, हरीश केवटे, दीपाली अवचट, संजय डबली, विजय फडणवीस, अनिल शिवणकर यांचे सहकार्य लाभले. सुरुवातीला राम भाकरे यांनी राम नामाचे भजन प्रस्तुत केले तर रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. विदयार्थ्यांसह शिक्षक, पालक, शाळेचे अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.