‘जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीचा घेतला आढावा
नागपूर समाचार : नागपुरात प्रशासनामार्फत 13, 14 व 15 जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार असून या महानाट्यासाठीच्या तयारीला आढावा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला. यशवंत स्टेडियम परिसरात महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरागाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल अशा तयारीची पाहणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
प्रवेश पासेसची माहिती प्रशासनामार्फत दिली जाणार असून या पासेस कुठे उपलब्ध होतील त्याची माहिती विविध प्रसार माध्यमांद्वारे दिली जाणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.
आ. प्रवीण दटके, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी पाहणीवेळी उपस्थित होते. जास्तीत जास्त शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांनी हे महानाट्य याची देही अनुभवण्यासाठी यशवंत स्टेडियमवर येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यावेळी केले.
शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग ‘जाणता राजा ‘ मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. उद्घाटनाच्या दिवशी अर्थात 13 जानेवारीला सायंकाळी 5.30 वाजता तर 14 व 15 जानेवारीला दररोज 6.30 ला प्रयोगाची सुरुवात होईल. उंट,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण कलाकार करणार आहेत.