हेमा मालिनी, कैलास खेरसह दिग्गज कलाकारांची उपस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीसह आढावा
नागपूर/रामटेक समाचार : राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या नेहरू मैदानात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन 19 ते 23 जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे.
स्थानिक कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात हेमा मालिनी, कैलास खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
दि. १९ ते २३ जानेवारीदरम्यान आयोजित या महोत्सवादरम्यान दि. १९ जानेवारी रोजी अभिनेत्री हेमा मालिनी, दि. २० जानेवारी रोजी हंसराज रघुवंशी यांचा कार्यक्रम, दि. २१ जानेवारी रोजी लोकनृत्य दि. २२ जानेवारी रोजी महानाट्य रामटेक, दि. २३ जानेवारी रोजी कैलास खेर यांचा कार्यक्रम होणार आहे.
रामटेकमध्ये महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन दर्जेदार होण्याची गरज आहे. या महोत्सवाचे आयोजन सुनियोजितपणे प्रशासनामार्फत करण्यात यावे. कार्यक्रम व्यवस्थानामध्ये स्टेज, स्टेजची लाइटिंग, लेझर शो, आतषबाजी व निविदांविषयीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. पार्किंग, वाहन व्यवस्था, बैठक व्यवस्थेचाही आढावा आज जिल्हाधिका-यांनी घेत आवश्यक निर्देश दिले.
रामटेकचे आ. ॲड. आशीष जायस्वाल, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिजल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहने, माजी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह रामटेक उपविभागातील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते.