जाणता राजाच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद
नागपूर समाचार : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व तेजस्वी व्यक्तीमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘जाणता राजा’ महानाट्याला नागपूर जिल्ह्याच्या विविध भागातील जनतेने उदंड प्रतिसाद दिला.या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहचल्याचे समाधान प्रशासनाने अनुभवले.गेल्या तीन दिवसांपासून यशवंत स्टेडियम येथे सुरु असलेल्या महानाट्याचा समारोप सोमवार दि.१५ जानेवारीला झाला.शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद दिला.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य राज्यात आयोजित करण्यात येत आहे.
शनिवार दि.१३ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘जाणता राजा’ महानाट्याचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने या महानाट्याचे यशस्वी आयोजन केले होते.
प्रयोगाआधी दररोज मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. समारोपाच्या प्रयोगाची आरती आमदार चंद्रशेखर बावनकुळे,विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,अतिरिक्त आयुक्त डॉ.माधवी चौरे, मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आदिंच्या उपस्थितीत झाली. यावेळी महानाट्याचे प्रमुख तथा महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अजित आपटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि त्यांच्या जन्मानंतर राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी लहानग्या शिवबांना दिलेले बाळकडू व मावळ्यांची मोट बांधून शिवबांनी स्वराज्य निर्मितीची घेतलेली शपथ, अशा या महानाट्यातील अनेक प्रसंगांनी उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. एकूण २०० पेक्षा अधिक कलाकार व तंत्रज्ञांचा भव्य फिरत्या रंगमंचावर लिलया व नेटका वावर प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता. नागपुरातील ७० कलाकारांनी या महानाट्यात बाल शिवाजी, राणी सईबाई, कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, अष्टप्रधान अशा वैविध्यपूर्ण भूमिका वठवल्या.
जवळपास साडे तीन तास चालणाऱ्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, मुत्सदेगिरी, प्रशासनावरील जरब, सौहार्द, निर्णयशक्ती दर्शविणारे प्रसंग, अफजलखानाचा वध, शाहिस्ते खानाची लाल महालातील कोंडी, छत्रपतींची आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक आदी प्रसंग गतइतिहास डोळयासमोर उभा झाला. सोबतीला पोवळे,भारुड, गौळणी, गोंधळ, वाघ्या -मुरळी,लावणी, कोळी नृत्य आदी लोककलांची महानाट्यातील नेमकी गुंफण आकर्षक ठरली. रंगमंचावरील प्रसंगानुरुप देखावे, घोडे, उंट ,तोफांचा वापर, साजेसे नैपथ्य, प्रकाश व संगीत संयोजन,संवादाची उत्तम फेक या सर्वानीच प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
शिवराज्याभिषेकाचा प्रसंग प्रेक्षकांमध्ये स्वराज्याच्या महानायकाचा सर्वोच्च सन्मान असल्याची प्रचिती उपस्थित प्रेक्षकांनी अनुभवली व छत्रपती शिवरायांचा प्रताप आपल्या काळजात बिंबवून घेतला. या महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये उपस्थित विद्यार्थी ,पालक, पाल्य, अबाल वृध्दांनी शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहास याची देही याची डोळा अनुभवला.
यापूर्वी १९९२ मध्ये नागपुरात या महानाट्याचा पहिला प्रयोग झाला होता. महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्य आणि परदेशात या महानाट्याचे हजारावर प्रयोग झाले. आजचा या महानाट्याचा ११४६ वा प्रयोग होता.
नागपूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासनाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनात आयोजन केले होते. राज्यस्तरीय महानाट्याची नागपूर मधील सुरुवात संस्मरणीय आणि इतर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. नागरिकांच्या भरघोस प्रतिसादासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आभार व्यक्त केले आहे.